कुठल्याही पुराव्याशिवाय स्वत:च्या वकिलाला भ्रष्टाचारप्रकरणी अटक करणाऱ्या सीबीआयला उच्च न्यायालयाने दणका देत आदर्शप्रकरणी लाच घेतल्याचा आरोप असलेल्या मंदार गोस्वामी या वकिलाला प्रकरणातून दोषमुक्त ठरवले.
आदर्शप्रकरणी दाखल विविध याचिकांवर सुनावणी सुरू असताना सीबीआयने या प्रकरणात सीबीआयची बाजू मांडणाऱ्या गोस्वामी यांना लाच घेतल्याच्या आरोपाप्रकरणी ६ मार्च २०१२ रोजी अटक केली होती. त्यांच्यासोबत आदर्श घोटाळ्यातील आरोपी माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी, त्यांचा मुलगा कैलास आणि कर सल्लागार जे. के. जग्ग्यासी यांनाही अटक करण्यात आली होती. आदर्शप्रकरणी कमी गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवण्यासाठी गिडवाणी पितापुत्र-जग्ग्यासी यांच्याकडून गोस्वामी यांनी लाच घेतल्याचा आरोप सीबीआयने त्यांच्यावर ठेवला होता. सीबीआयच्या आरोपानुसार, गिडवाणी यांनी जग्ग्यासीला १.२५ कोटी रुपये दिले होते. नंतर ही रक्कम लाच म्हणून गोस्वामी यांच्यासह प्रकरणाच्या तपासाशी संबंधित सीबीआय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. गोस्वामी यांना २५ लाख रुपये लाच दिल्याचा दावा सीबीआयने केला होता. आपल्याला या प्रकरणी गोवण्यात आले आहे, असा दावा करीत गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात याचिका केली व गुन्हा रद्द करण्याची विनंती केली होती. गोस्वामी यांनी लाचेची मागणी केली व ती स्वीकारल्याचे आरोपपत्रात कुठेच नमूद नाही, असे गोस्वामी यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला.
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि आरोपपत्र वाचल्यानंतर न्यायमूर्ती एम. एल. टहलियानी यांनीही आरोपपत्रात गोस्वामी यांच्याविरुद्ध कुठलाही पुरावा नसल्याचे निरीक्षण नोंदवले. आपण अमुकांना लाच दिल्याचे जग्ग्यासीने गिडवाणींना सांगितले होते. त्यात सीबीआयचे अधिकारी, वकील एवढेच नव्हे, तर माजी महाधिवक्त्यांच्या नावाचा समावेश त्याने केला होता. मग केवळ गोस्वामींनाच का अटक करण्यात आली नाही, असा खोचक सवाल न्यायालयाने सीबीआयला केला. तसेच गोस्वामींनी लाच मागितल्याचा वा स्वीकारल्याचा एक तरी पुरावा आहे का, अशी विचारणाही न्यायालयाने केली. त्याला सीबीआयकडून काहीच समाधानकारक उत्तर दिले गेले नाही. त्यानंतर न्यायालयाने गोस्वामींवरील आरोप न्यायालयाने रद्द केला.