प्रचार संपण्यास केवळ सहा दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेकडून दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरूवात १७ एप्रिलपासून अभिनेते आदेश बांदेकर यांच्या ‘रोड शो’ ने होणार आहे.
उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आतापर्यंत शिवसेनेचे खा. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या दोन सभा झाल्या आहेत. त्यानंतर संपूर्ण आठवडाभर महायुतीसाठी एकाही नेत्याची सभा झाली नाही. ही उणीव भरूण काढण्याचा प्रयत्न आता महायुतीने प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात केला असून गुरूवारी सायंकाळी पाच वाजता अशोक स्तंभपासून अभिनेते आदेश बांदेकर यांचा रोड शो होणार आहे. त्यानंतर शुक्रवारी गोल्फ क्लब मैदानावर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा होईल. शनिवारी दिवाकर रावते, सोमवारी माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्या जाहीर सभा होणार आहेत. याशिवाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खा. रामदास आठवले, भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याही सभा होणार असल्याची माहिती महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली. गोडसे हे महायुतीचे उमेदवार असले तरी आतापर्यंतच्या प्रचारात रिपाइं आणि भाजप यांचा विशेष सहभाग आढळून येत नसल्याने त्यांच्या नेत्यांनाच सभांसाठी आमंत्रित करण्याचा उतारा शिवसेनेने शोधला आहे.