‘होम मिनिस्टर’मुळे घरोघरी लाडके झालेले भाऊजी अर्थात अभिनेते आदेश बांदेकर हे गुरुवारी नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ ‘रोड शो’साठी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथील अशोक स्तंभ परिसरात उतरताच महिलांनी एकच गर्दी करत त्यांच्या नावाचा जयजयकार केला.
गुरुवारी सकाळी त्र्यंबकेश्वर येथे बांदेकर यांचा रोड शो झाला. या रोड शोनिमित्त महायुतीच्या वतीने संपूर्ण मार्ग भगवामय करण्यात आला होता. त्र्यंबक राजाचे दर्शन घेत त्यांनी तेथे पूजा, अभिषेक केला. दर्शनानंतर त्यांच्या रोड शोला सुरुवात झाली. एकीकडे उन्हाचा पारा चढत असतांना नागरिकांनी बांदेकर यांचे जल्लोशात स्वागत केले. महिलांमध्ये त्यांचे औक्षण करण्यासाठी एकच चढाओढ सुरू होती. रस्त्याने ठिकठिकाणी त्यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत होता. मंदिर चौक परिसरापासून सुरू झालेला रोड शो पांच आळी, मेनरोड, तेलीगल्ली, पाटीलगल्ली या ठिकाणी समाप्त झाला. रोड शोमध्ये देण्यात येणाऱ्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
त्र्यंबकेश्वर नंतर सायंकाळी नाशिक येथील अशोक स्तंभपासून आदेश बांदेकर यांच्या रोड शोला सुरुवात झाली. तुफान गर्दीमुळे या चौकातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मल्हार खाणीजवळ त्यांच्या औक्षणासाठी महिलांमध्ये अक्षरश: रेटारेटी सुरू होती. हसतमुखाने सर्वाना प्रतिसाद देत बांदेकर हे पुढे पुढे सरकत होते. त्यांच्या समवेत उमेदवार हेमंत गोडसे, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विनायक पांडे, भाजपच्या देवयानी फरांदे आदी उपस्थित होते.