आधार कार्डाच्या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारू नये असे सरकारी धोरण असतानाही पनवेलमध्ये सर्रासपणे २०० रुपये घेऊन आधार कार्ड दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पनवेल तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तहसील कार्यालयात येण्यापेक्षा महा-ई-सेवा केंद्राद्वारे सरकारी विविध दाखले नागरिकांना त्यांच्या शहरामध्ये मिळतील यासाठी ही महा-ई-सेवा केंद्राची योजना सुरू करण्यात आली. रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, शिधावाटप पत्रिकेतील नावात बदल, आधारकार्ड आदींसाठी ही सेवा केंद्रे आहेत. परंतु या सेवांसाठी शुल्क आकारले जात असल्याची अनेकांची तक्रार आहे. पनवेल शहरामधील नवीन पनवेल पोलीस ठाण्याच्या शेजारी अनुपम कॉ-ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या तळमजल्यावरील गाळ्यामध्ये साईराज इंटरप्रायजेसच्या कार्यालयामध्ये महा-ई-सेवा केंद्र सुरू आहे. या केंद्रात हा प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.  पनवेलमध्ये राहणारे खैरे कुटुंबीय आधारकार्डाची नोंद करण्यासाठी या ई-सेवा-केंद्रात गेले होते. तेथे गेल्यावर त्यांना येथील अनागोंदी कारभार पाहण्यास मिळाला. या केंद्रामध्ये आधारकार्डचे अर्ज १० रुपयांमध्ये विकले जातात, तसेच हे अर्ज कार्यालयातील व्यक्तीने भरल्यास त्या अर्जाची किंमत २० रुपये होते. त्यानंतर आधारकार्डसाठी प्रती मानसी २०० रुपये घेतले जातात. या केंद्रामध्ये बालकांच्या आधारकार्डासाठी हेच शुल्क शंभर रुपये आकारत असल्याचे खैरे यांचे म्हणणे आहे.
याच आधारकार्डासाठी २०० रुपयांपेक्षा जास्त रक्कम देणाऱ्या व्यक्तींना रांग न लावता थेट कार्डाच्या नोंदणीसाठी घेतले जाते. हा सर्व बेकायदा प्रकार खैरे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी थेट पनवेल तहसीलदार कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार बी. टी. गोसावी यांच्याकडे रीतसर लेखी तक्रार केली आहे. तालुक्यामधील सर्वच महा-ई-सेवा केंद्रांमध्ये आधारकार्डसाठी दोनशे रुपये मोजावे लागतात असे सांगण्यात येते. केंद्र सुरू झाल्यावर त्यामधून होणाऱ्या भ्रष्टाचाराला केंद्रांना परवानगी देणारे अधिकारी का आळा घालत नाहीत? असा प्रश्न खैरे कुटुंबीयांप्रमाणे अनेक नागरिकांना पडला आहे.
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पनवेल तालुक्यामध्ये आधारकार्ड नोंदविण्याची योजना सुरू न झाल्याने नागरिकांना महा-ई-सेवा केंद्राचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामधून लवकरच आधारकार्ड नोंदणीसाठी ठिकठिकाणी केंद्र सुरू झाल्यास, सरकारी योजनांसाठी सामान्यांकडून पैसे उकळणाऱ्या महा-ई-सेवा केंद्रांकडे आपसूकच नागरिक पाठ फिरवतील, असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला.

नागरिक स्वखुशीने पन्नास रुपये देतात
या संदर्भात साईराज इंटरप्रायजेस या महा-ई-सेवा केंद्राचे मालक संदीप पवार यांनी आधारकार्डसाठी दोनशे रुपये घेत नसल्याचे सांगितले. मात्र काम झाल्यावर काही नागरिक स्वखुशीने पन्नास रुपये देतात, त्यामुळे महा-ई-सेवा केंद्राच्या कर्मचाऱ्यांचा पगार निघतो, असे पवार यांनी सांगून आपली बाजू स्पष्ट केली आहे.

आधारकार्डसाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. महा-ई-सेवा केंद्र चालविणाऱ्यांना त्याबाबतचे कमिशन थेट योजनेतील अटी शर्तीप्रमाणे दिले जाते. याअगोदरही पवार यांच्या केंद्राची तक्रार एका नागरिकाने केली होती. पवार यांना कोणाकडूनही आधारकार्ड नोंदणीसाठी पैसे घेऊ नयेत असे बजावले होते. तरीही हा प्रकार सुरू असल्याचे त्यानंतर आलेल्या सचिन खैरे यांच्या तक्रारीवरून दिसते. या तक्रारींच्या आधारे पवार यांच्या मालकीच्या महा-ई-सेवा केंद्राचा परवाना देणाऱ्या विभागाकडे त्यांच्या कार्यपद्धतीबाबतचा अहवाल पाठविण्यात येणार आहे.  
    बी. टी. गोसावी, पनवेल-नायब तहसीलदार.