वर्षभरावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात वेगवेगळ्या त्रुटी समोर येत असून हे शिवधनुष्य पेलणे प्रशासनाला अवघड झाल्याचे दिसत आहे. साधुग्रामसाठी ३५० एकर जागेची मागणी असली तरी विविध कारणांस्तव अधिकतम २२५ ते २५० एकर जागा उपलब्ध होऊ शकते. रमणी समितीच्या शिफारशीनुसार शाही मार्गाचे रुंदीकरण अद्याप झाले नसल्यामुळे हा मार्ग धोकादायक ठरू शकतो. दसक आणि टाकळी घाटांचा विकास केला जात असला तरी त्यावरील खर्च पाण्यात जाईल अन् शहरात पुराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. सिंहस्थ कामात अनेक त्रुटींची मालीका निर्माण झाली असून त्यांचे अल्पावधीत निराकरण करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.
पुढील वर्षी १४ जुलैपासून सिंहस्थ कुंभमेळ्याला नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये सुरूवात होत असून त्या संदर्भातील तयारी, साधु-महंतांना अपेक्षित असणाऱ्या सोई-सुविधा या विषयावर बुधवारी जिल्हा प्रशासन देशभरातील प्रमुख महंतांसमवेत चर्चा करणार आहे. याआधी स्थानिक साधु-महंतांसमवेत वारंवार चर्चा झाली असली तरी देशभरातील प्रमुख आखांडय़ांच्या प्रमुखांसोबत होणारी ही पहिलीच बैठक आहे. जिल्हा प्रशासन साधु-महंतांशी कोणत्याही प्रकारचा समन्वय साधत नसल्याची तक्रार केली जात होती. सिंहस्थ शाखेने खालसा परिषद, चतुसंप्रदाय आखाडा, स्थानिक आखाडय़ांचे महंत यांच्याशी संपर्क साधून बैठकीचे निमंत्रण दिले आहे. या बैठकीत देशभरातील जवळपास प्रमुख १२ ते १५ महंत तसेच स्थानिक पातळीवरील महंत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. बैठकीच्या पाश्र्वभूमीवर, सिंहस्थानिमित्त चाललेल्या कामांवर नजर टाकल्यास त्यातील अनेक त्रुटी निदर्शनास येतात.
कुंभमेळ्याच्या नियोजनात सर्व यंत्रणांमध्ये सुसंवाद हा महत्वपूर्ण घटक. सुसंवादासाठी नियमित बैठका होणे अत्यावश्यक आहे. परंतु, कुंभमेळ्यासंदर्भात जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या नियमित बैठका होत नसल्यामुळे प्रत्येक विभागाच्या कार्यपूर्ततेचे सिंहावलोकन करणे अवघड झाले आहे. साधु-महंतांची ही बैठक बऱ्याच भवती न् भवतीनंतर होत आहे.
रमणी समितीच्या शिफारशीनुसार शाही मार्गाचे रुंदीकरण अद्याप झालेले नाही. महापालिकेने अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही केलेली नाही. या मार्गाचे रुंदीकरण दृष्टीपथास न आल्यास तो मार्ग धोकादायक ठरू शकतो. रमणी समितीच्या शिफारशीनुसार शाही मार्ग अरुंद असल्यामुळे येणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करणे ही आव्हानात्मक बाब होऊ शकते. शाही मार्गावरील धोकादायक इमारतींचे अवलोकन होणे तितकेच आवश्यक आहे. दुरुस्ती, देखभाल अथवा पुनर्बांधणी या माध्यमातून त्या इमारतींमार्फत होणारा धोका कमी करण्याची गरज अधोरेखीत होत आहे.

साधुग्रामसाठी केवळ २२५ एकर जागा ?
साधु-महंतांनी साधुग्रामसाठी ३५० एकर जागेची मागणी केली आहे. प्रशासनाने ३२४ एकर जागेचे नियोजन केले आहे. परंतु, या जागेवर शेती, घरे, रामसृष्टी, ब्रम्हा व्हॅली महाविद्यालय अशा इमारती असल्यामुळे साधुग्रामसाठी नियोजित जागा पूर्णपणे उपलब्ध होणे अवघड आहे. सद्यस्थितीत साधुग्रामसाठी केवळ २२५ ते २५० एकर जागा उपलब्ध होईल, असा अंदाज आहे.

विकास कामातील असमतोल
सिंहस्थानिमित्त घाटांचा विकास केला जात आहे. परंतु, घाटांशी निगडीत अंतर्गत व बाह्य रस्त्यांचा विकास होत नसल्यामुळे समतोल विकास होत नाही. घाटांचा विकास ज्या वेगाने होत आहे, त्याच वेगाने घाटांशी निगडीत असलेले अंतर्गत व बाह्य रस्त्यांचा विकास होत नसल्याने विकासातील असमतोलाचा परिणाम गर्दी व्यवस्थापनावर होऊ शकतो. यामुळे घाटांच्या विकासाबरोबर रस्ते व अंतर्गत मार्गाचा विकास रुंदीकरण होणे आवश्यक आहे.

विशेष प्रशिक्षणाकडे कानाडोळा
सिंहस्थ कुंभमेळ्याचे यश प्रशिक्षित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ कुंभमेळ्याच्या दरम्यान योग्य पध्दतीने कार्य करू शकते. त्या पध्दतीने अप्रशिक्षित मनुष्यबळ काम करू शकणार नाही. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी आपत्ती व्यवस्थापनासह विशेषीकृत प्रशिक्षणाची गरज मांडली गेली. तज्ज्ञ व्यक्तींकडून ते प्रशिक्षण दिले जायला हवे. या अनुषंगाने पोलीस यंत्रणा वगळता इतर विभागांनी तसे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केलेले नाही. नाशिक शहर पोलिसांनी जुलैपासून या प्रशिक्षणाला सुरुवात केली असून आतापर्यंत ८०० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.

मोकळ्या जागांचे नियोजन नाही
पर्वणीच्या काळात गर्दीच्या वेळी अथवा पूर स्थिती, अतिवृष्टी झाल्यास भाविकांना थांबवून ठेवण्यासाठी मोकळ्या जागांचे कोणतेही नियोजन झाले नसल्यामुळे ऐनवेळी दुर्घटनेचे स्वरुप गंभीर होऊ शकते. आपत्कालीन काळात भाविकांना थांबवून ठेवण्यासाठी प्रशासनाने पंचवटीतील वेगवेगळ्या भागात अशा मोकळ्या जागा निश्चित करून त्या जाहीर करणे आवश्यक आहे. त्यानंतर उपरोक्त जागांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वैद्यकीय सुविधा पुरविणे अनिवार्य ठरेल. अन्यथा या सुविधांअभावी भाविकांची गैरसोय होईल.

दसक व टाकळी घाटावरील खर्च व्यर्थ ठरणार ?
दसक व टाकळी घाटांचा विकास करण्यात येत आहे. गोदावरी पात्रात भराव टाकून हे काम सुरू आहे. यामुळे शहरात पुराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाने ही शक्यता फेटाळून लावली असली तरी जेव्हा पूरस्थिती निर्माण होईल, तेव्हा खरे चित्र स्पष्ट होईल. या घाटांवर अमरधाम असल्यामुळे भाविक त्यावर जाण्यास टाळाटाळ करतील. त्यामुळे हे घाट बांधण्यासाठी खर्च केला जाणारा कोटय़ावधीचा निधी व वेळही वाया जावू शकतो. त्याचा प्रशासनाने विचार केलेला नाही.

वाहनतळाच्या नियोजनात संदिग्धता
विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय नसल्याने घाटांचे नियोजन तसेच वाहनतळाच्या नियोजनात संदिग्धता निर्माण झाली आहे. ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ अथवा मोफत वाहनतळाची सुविधा या संदर्भात महापालिकेने कोणतीही सुस्पष्ट योजना मांडलेली नाही. यामुळे प्रचंड संख्येने येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या तळाचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. वाहनतळ आणि त्यावर किती वाहने उभी राहू शकतील अर्थात त्यांची क्षमता याची वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध नाही.

धोक्याची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणेचा विसर
कोणत्याही शासकीय विभागाने धोक्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा विकसित वा तयार केली नसल्याने सिंहस्थ कुंभमेळ्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. धोक्याची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणेमुळे नैसर्गिक आपत्तीबाबत प्रशासनाला पूर्वकल्पना मिळू शकते. उदाहरणादाखल अतिवृष्टीचा विचार करता येईल. पर्वणीच्या काळात अतिवृष्टी होणार असल्यास त्याबद्दल पूर्वसूचना मिळाल्यास नागरिकांना जागरुक राहण्याचे आवाहन करता येईल. बाधीत क्षेत्रातून काही काळ नागरिकांना आधीच बाहेर पडण्याची सूचना करता येईल. धोक्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सतत हवामानाविषयी माहिती घेऊन सजगपणे काम करू शकते. पण, यावर गांभीर्याने विचार झाल्याचे दिसत नाही.

आपत्कालीन नियोजन आराखडा अधांतरी
दोन ते तीन शासकीय विभाग वगळता इतर सर्व यंत्रणांचा आपत्कालीन नियोजन आराखडा अजुन तयार झालेला नाही आरोग्य, एसटी महामंडळ, रेल्वे प्रशासन, महसूल विभाग यांचा आपत्कालीन नियोजन आराखडा तयार झाल्यास येणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीसाठी संबंधित यंत्रणेला उपाय योजना करणे सुलभ होवू शकते.

२००० एसटी बसेसने काय साध्य होईल ?
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एसटी महामंडळाने भाविकांच्या वाहतुकीसाठी दोन हजार बसेसचे नियोजन केले आहे. परंतु, ८० लाख भाविकांच्या वाहतुकीची सोय दोन हजार बसमार्फत कशा पध्दतीने होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाविकांची संख्या आणि बसेसची आवश्यकता या संदर्भात नियोजनाचा अभाव दिसतो. त्यात सुस्पष्टता नाही. या बाबत एसटी महामंडळाने ‘सिम्युलेशन मॉडेल’ तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे.

रेल्वेचीही अनास्था
सिंहस्थाबाबत रेल्वे प्रशासनाने नेमके काय नियोजन केले आहे, त्याची कोणतीही माहिती यंत्रणांना प्राप्त झालेली नाही. यामुळे अलाहाबाद प्रमाणे दुर्घटना होवू शकते. अलाहाबाद येथे रेल्वे फलाटावर प्रचंड गर्दी जमल्याने चेंगराचेंगरीची दुर्घटना घडून भाविक मरण पावले होते. नाशिकरोड रेल्वे स्थानकाबाबत कोणते नवीन निर्णय घेण्यात आले याची माहिती अद्याप नाही. कुंभमेळ्यादरम्यान लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने कोणत्या सोई-सुविधा केल्या त्याची माहिती इतर यंत्रणांना अपेक्षित आहे.