ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्रात प्रवेशासाठी पावसाळ्यात यावर्षी प्रथमच मोहर्ली व नवेगाव, अशी दोन प्रवेशव्दारे सुरू ठेवण्यात आली आहेत, तसेच येथील गाडय़ांची संख्या सुध्दा वाढवून देण्यात आली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात व्याघ्र प्रकल्पांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्र अंशत: चालू ठेवून निसर्ग पर्यटनासाठी केवळ मोहर्ली प्रवेशव्दाराने प्रवेश देण्यात येत होता, परंतु आता वन्यजीव विभागाने नवेगाव प्रवेशव्दारातून सकाळी ३ व दुपारी ३ वाहनांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ताडोबात पावसाळ्यात जायचे असेल तर मोहर्ली व नवेगाव, अशी दोन प्रवेशव्दारे सुरू राहतील. वन्यजीवांच्या सहज दर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प विशेष उल्लेखनीय आहे. या प्रकल्पात उत्तम प्रकारे व्याघ्रदर्शन होत असल्यामुळे दरवर्षी पर्यटक मोठय़ा प्रमाणात निसर्ग पर्यटन प्रकल्पास भेट देतात. मागील वर्षी लाखो निसर्गप्रेमी पर्यटकांनी प्रकल्पाला भेट दिलेली आहे. पावसाळ्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मानवी हस्तक्षेप होऊ नये, तसेच निसर्गप्रेमी पर्यटकयांची रस्त्यामुळे गैरसोय होऊ नये, यासाठी फक्त मोहर्ली ते ताडोबा व परत, अशा या डांबरी रस्त्यांवर मोहर्ली प्रवेशव्दारातून १ जुलै २०१४ पासून मर्यादित दहा वाहनांनाच प्रवेश दिला जात होता.
आता नवेगाव प्रवेशव्दारातून ३ वाहने सकाळच्या फेरीत व ३ वाहनांना दुपारच्या फेरीमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले आहेत. वन विभागाच्या या निर्णयाने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पावसाळ्यात प्रकल्प बंद राहात असल्याने बहुतांश पर्यटक येण्याचे टाळतात, परंतु आता एकाच वेळी दोन प्रवेशव्दारे सुरू राहणार असल्याने पर्यटकांना सुध्दा वनभ्रमंतीसाठी सोयीचे होणार आहे. बहुतांश पर्यटक बफर क्षेत्रात जंगल सफारी करून निघून जायचे, परंतु आता अशा पर्यटकांना कोअर क्षेत्रातील जंगल सफारी करता येणार आहे, तरी निसर्गप्रेमींनी याचा लाभ घ्यावा. प्रत्येक मंगळवारी आधीप्रमाणे प्रवेश बंद राहील. प्रवेशाची परवानगी मोहर्ली व नवेगाव प्रवेशव्दारावर उपलब्ध राहील, असे उपसंचालक ए.एस.कळसकर यांनी कळविले आहे.