‘तो मी नव्हेच’ असेच तो आरोपी जोरजोरात सांगत होता. पोलिसांच्या नोंदीवर जे नाव होते त्याच्याशी आपला काय संबंध, असाच त्याचा तोरा होता. त्यामुळे आता खात्री पटविण्यासाठी पोलिसांना काही ठोस पुरावा द्यावा लागणार होता. २८ वर्षांपूर्वी या आरोपीच्या माहितीची नोंद ठेवताना, पाठीवरील तीळ, असा उल्लेख होता. मग सर्वादेखत त्या आरोपीच्या पाठीवर तीळ आढळला अन् तो जेरबंद झाला..उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील १३ हजार फरारी आरोपींचा सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने शोध सुरू केला आहे. त्यापैकी पाच हजार आरोपी हे गंभीर स्वरूपातील गुन्ह्य़ात फरार आहेत. अशाच एका रमेशसिंह ठाकूर या फरारी आरोपीच्या शोधासाठी पोलीस वाराणसी येथे गेले. १९८४ पासून रमेशसिंह फरार होता. त्याचा पूर्वीचा जबाब आणि तपशील काढून पोलिसांनी शोध सुरू केला.
साधारणत: छायाचित्रावरून त्याची ओळख पटली. त्याला ताब्यात घेण्यात आले. परंतु आपण रमेशसिंग ठाकून नसून त्रिभुवन सिंह आहोत, असे तो सांगू लागला. परंतु पोलिसांना मात्र तो रमेशसिंगच असल्याची खात्री होती. परंतु गेले २६ वर्षे तो गावात त्रिभुवन सिंह या नावाने परिचित होता. गाववालेही त्याच्या बाजूने बोलू लागले. अखेरीस स्थानिक पोलिसांनीही मुंबई पोलिसांना त्याची खरी ओळख पटविण्यास सांगितले. त्या वेळी त्याच्या पाठीवरील तीळ उपयोगी पडला आणि त्याला अटक करणे पोलिसांना शक्य झाले. या तपशिलानंतर तोही काहीही बोलू शकला नाही. गेले २० ते ३० वर्षे फरार असलेल्या आरोपींचा शोध घेताना पोलिसांची अक्षरश: दमछाक होत आहे. परंतु या सर्व आरोपींना शोधून पुन्हा तुरुंगात डांबणे याला आम्ही महत्त्व दिल्याचे सहआयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांनी स्पष्ट केले. फरारी आरोपींना जामीन देणाऱ्यांचाही पोलिसांनी आता शोध सुरू केला आहे. त्या वेळी काही जामीनदार बनावट असल्याचेही आढळून आले आहे. काही आरोपींचा अनेक वर्षे शोधच घेतला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.