पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत प्रचाराचे फंडे बदलत असल्याचे नेहमीच दिसून आले आहे. भाजपने मोदी सरकार केंद्रात प्रत्यक्षात आणण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला.  निवडणुकीच्या कालावधीत क्षणाक्षणाला आघाडी सरकार कसे भ्रष्ट, सुस्त असल्याचे मीडियामार्फत पटवून दिले जात होते. त्याचा व्हावा असा वाटणारा परिणाम केंद्र आणि राज्यात झालेल्या तख्त बदलामुळे दिसून आला आहे. आता हाच फंडा ग्रामपंचायतीपासून ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीपर्यंत राबविला जाईल याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. सध्या नवी मुंबईत पालिका निवडणुकीचा माहोल सुरू आहे. सोशल मीडियावर प्रचाराचा मारा प्रत्येक उमेदवार करताना दिसत आहे. त्यात कडक उन्हाळ्याचे दिवस. त्यामुळे दुपारच्या वेळी हा प्राइम टाइम म्हणून ठेवला जात आहे. आम्ही प्रभागात काय केले, काय करणार आहोत, प्रत्येक कार्यक्रमांचे छायाचित्र, प्रचारफेरी, सभा यांचे दर्शन या सोशल मीडियाद्वारे केले जात आहे. यात ‘व्हॉटसअप’ आघाडीवर आहे, कारण हातातील मोबाइलवर एका क्षणात उमेदवाराची माहिती यामुळे पोहोचविली जात आहे. काही उमेदवारांनी निवडणुकीपूर्वी काही कॉलेजच्या मुलांना कामाला लावून प्रभागातील माहिती मोबाइलसह संकलित केलेली आहे. ती १००च्या ग्रुपसह एक दोन.. तयार करण्यात आली असून दोन ते तीन हजार मतदारांच्या संपर्कात राहण्याची यंत्रणा उभारण्यात आली आहे. यात ‘व्हॉटसअप’ वापरत नसणाऱ्या मतदारांना ‘एसएमएस’द्वारे संपर्क साधला जात आहे. बहुतांशी उमेदवारांच्या यादीत पत्रकारांचा समावेश हमखास असल्याने उमेदवारांच्या कार्यक्रमांची रूपरेषा घरबसल्या पत्रकारांना मिळत आहे. सोशल मीडियाचा हा मारा दुपारच्या वेळेत आणि रात्री उशिरा उमेदवार खुद्द पोस्ट करून करीत आहेत. कारण रखरखत्या या उन्हात प्रचारासाठी बाहेर पडण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे सकाळ, संध्याकाळच्या वेळेत घरोघरी संपर्क अभियानावर उमेदवारांनी भर दिला आहे मात्र दुपारच्या वेळी काही वामकुक्षी घेणाऱ्यांची झोपमोड होत आहे हा भाग वेगळा.