‘आरपीएफ’च्या पथकाने भारत टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या योगेश बाजीराव नाावाच्या दलाला अटक केली असून कार्यालयाची कसून तपासणी केली.  
रवींद्रसिंग ठाकूर हे ट्रॅव्हल्सचे मालक आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कार्यालयाचे व्यवस्थापन योगेश यांच्याकडे आहे. अधिकृत असे एजंट रेल्वे तिकिटांचे आरक्षण करण्यासाठी नेमण्यात आले होते. परंतु रेल्वे तिकिटांचा काळाबाजार टुर्स आणि ट्रॅव्हल्सचे कर्मचारी करतात हे लक्षात आले. त्यामुळे एक महिन्यापूर्वी या एजंटावर बंदी घालण्यात आली. एकही एजंट आरक्षण केंद्राकडे फिरकला नाही. एका प्रवाशाने मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकाकडे अधिकृत एजंट एका तिकिटावर जास्त पैसे घेत असल्याची तक्रार केली होती. रेल्वे अधिकाऱ्यांनी याप्रकरणाची शहनिशा करून सहायक वाणिज्य व्यवस्थापक राव यांनी आरपीएफच्या मदतीने सापळा रचला. त्यांनी भारत टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सकडे खात्री करून घेण्यासाठी तिकिटाचे आरक्षण केले. असा प्रकार आणखी कुठे चालतो काय याची खात्री केली. परंतु रेल्वे तिकीट देण्यास त्यांनी नकार दिला. राव आजचा प्रवास असल्यामुळे तिकीट घेण्यासाठी कार्यालयात गेले. गैरव्यवहार विरोधी पथकाचे निरीक्षक राव, आरपीएफ निरीक्षक कल्याण मोरे, शिपाई
विकास शर्मा, विनोद राठोड यांच्यासह कार्यालयात पोहोचले असता योगेशने राव यांच्यासह अन्य प्रवाशांची तिकिटे इतवारी आरक्षण केंद्रातून काढली होती. राव यांना जास्त पैसे घेऊन तिकीट दिले होते. अशाप्रकारे तिकीट विक्री सुरू असल्याचे स्पष्ट होताच आरपीएफच्या पथकाने कार्यालयाची झडती घेतली. यात २० रुपये किमतीची तिकिटे, आरक्षण अर्ज आणि प्रवाशांचे लिफाफे जप्त करून योगेशला अटक करण्यात आली.