पीएनजी टोल वे लिमिटेड या कंपनीकडून करण्यात आलेली पिंपळगाव बसवंत येथील नाक्यावरील टोल वाढ पूर्णत: बेकायदेशीर असून अद्याप नाशिक ते पिंपळगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनच्या विस्तारीकरणाचे काम अपूर्ण असतानाही टोलमध्ये वाढ करण्याचे कारण काय, असा प्रश्न आ. अनिल कदम यांनी उपस्थित केला आहे. टोल दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही आ. कदम यांनी दिला आहे.
पिंपळगाव बसवंत येथील टोल नाका विविध कारणांमुळे सतत वादग्रस्त ठरत आला आहे. या नाक्यावर सर्व कर्मचारी या महिला असून वाहनधारकांशी त्यांची वागणूक सौजन्यशील नसते, असा आक्षेप वारंवार घेण्यात येतो. आ. कदमांसह अनेक लोकप्रतिनिधींनाही त्याचा अनुभव आला आहे. त्यातच महामार्गाचे काम संपूर्णपणे पूर्ण झाले नसताना टोलमध्ये वाढ करण्याचे कारण काय, असा प्रश्न वाहनधारकांकडून विचारला जात आहे. काही ठिकाणी महामार्गाचे काम अद्याप सुरू असल्याने दोन ते तीन तासासाठी वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार होत असतात.
या प्रकल्प अहवालात नमूद केल्याप्रमाणे सव्‍‌र्हिस रोडचे काम देखील मोठय़ा प्रमाणावर प्रलंबित असल्याचे कदम यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या प्रकल्प संचालकांच्या निदर्शनास आणून दिले आहे. पिंपळगाव व ओझर येथील उड्डाण पुलाचा प्रश्न देखील प्रलंबित असल्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतूक ठप्प होते. याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ओझर येथे खंडेराव महाराज मंदिरासमोरही योग्य ती व्यवस्था होत नसल्याने कायम अपघात होत असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
टोल मार्गाच्या बांधकामात मोठय़ा प्रमाणावर तांत्रिक अडचणी असून त्या दूर करणे आवश्यक आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम नियोजनहीन झाल्यामुळे उड्डाण पुलाचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाहनचालक करीत नसून सदर उड्डाणपूल वापर करणाऱ्या व्यक्तींकडूनच उड्डाणपुलाचा टोल वसूल करावा अशी सूचनाही आ. कदम यांनी केली आहे. याबाबत पत्रव्यवहार करूनही अद्याप आपल्या कार्यालयाकडून कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे कदम यांनी प्रकल्प संचालकांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
 रस्त्याचे कामकाज अत्यंत नियोजनशुन्य पध्दतीने सुरू असल्याने प्रस्तावित टोल वाढ मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या मागण्यांविषयी कोणतीही कार्यवाही न करता टोल वाढ वाहनधारकांवर लादण्याचा प्रयत्न झाल्यास जन आंदोलनाच्या माध्यमातून टोल वाढीला विरोध केला जाईल. त्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या समस्येस पीएनजी टोल वे लिमिटेड आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार असतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.