अनधिकृतपणे पाणी वापरणाऱ्यांमुळे भेडसाविणाऱ्या पाणीटंचाईच्या निषेधार्थ घोडबंदर परिसरातील वाघबीळ, कावेसर आणि किंग-काँगनगरमधील रहिवाशांनी सोमवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा आणला.
गेल्या कित्येक वर्षांपासून वाघबीळ, कावेसर आणि किंग-काँगनगर भागातील रहिवाशांना पाणीटंचाई भेडसावत आहे. पाणी चोरीमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे अधिकृत नळधारकांना मुबलक पाणी मिळत नाही. काही भागात नळ आहेत पण, त्यांना पाणीच येत नाही. पाण्यासाठी महिलांना विजयनगरी जलकुंभावर जावे लागते. असे असतानाही महापालिका  बिले मात्र वेळेवर पाठवते, असा आरोप करत महिलांनी सोमवारी महापालिका मुख्यालयावर हंडा मोर्चा काढला. तसेच या आंदोलनानंतरही महापालिकेला जाग आली नाही तर यापुढे उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही महिलांनी दिला.
आयुक्तांच्या भूमिकेमुळे लोकप्रतिनिधी पेचात
विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्यासोबत महिलांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांची भेट घेऊन पाणी समस्येचा पाढा वाचला. झोपडपट्टय़ांमधील बेकायदा नळ जोडण्यांमुळे येथील नळधारकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे बेकायदा नळधारकांचा शोध घेऊन त्यांना अधिकृत नळ जोडणी द्यावी. जेणेकरून या भागात सर्वाना मुबलक पाणी पुरवठा होईल, अशी मागणी डुंबरे यांनी केली. मात्र, बेकायदा झोपडय़ांना नियमबाह्य़ जोडण्या देता येणार नाहीत. महापालिकेच्या धोरणानुसारच नळ जोडण्या देण्यात येतील, असे आयुक्त गुप्ता यांनी स्पष्ट केले. तसेच या झोपडय़ांना नळ जोडणी दिली तर तो संपूर्ण शहरासाठी निर्णय लागू होईल. त्यामुळे ठाणे शहरातील झोपडपट्टय़ांमध्ये अशा जोडण्या द्यायच्या असतील तर लोकप्रतिनिधींनी त्यासंबंधी सर्वसाधारण सभेत निर्णय घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात गटनेत्यांची बैठक घेऊन त्यामध्ये यासंबंधीचे धोरण ठरवावे. त्याआधारे महापालिका प्रशासनातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येईल आणि तो येत्या २० जानेवारीपर्यंत सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.