राज्यातील सर्व निवृत्त राज्य कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता जून २०१३ नंतर दिवाळीपूर्वीच देण्याचा तसेच सेवेतील कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीत मार्च २०१४ मध्ये जमा करण्याचे आदेश मे २०१३ मध्ये काढण्यात आले होते. परंतु नाशिक महापालिका शिक्षण मंडळाने हा आदेश धाब्यावर बसविला असून निवृत्त शिक्षकांना अद्याप पाचव्या हप्त्याची रक्कम देण्यात आलेली नसल्याची तक्रार सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेने केली आहे. रक्कम त्वरीत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शिक्षण मंडळाचे कामकाज कायम कासव गतीने चालत असल्याचे टीकास्त्रही संघटनेने सोडले आहे. आपल्या संथ कारभारामुळे शिक्षकांचे खूपच हाल होतात हे मंडळाच्या लक्षात येत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वेळेवर हप्त्याची रक्कम मिळावी म्हणून संघटनेतर्फे आयुक्त, महापौर, शिक्षण मंडळ, शिक्षण उपसंचालक या सर्वाना अनेकवेळा निवेदन देण्यात येऊनही कोणीही दखल घेतलेली नाही. जिल्ह्य़ातील सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना ही रक्कम कधीच प्राप्त झाली आहे. परंतु शिक्षण मंडळ प्रशासन, शिक्षण उपसंचालक व आयुक्त यांनी अनुदानच दिले नसल्याचे कारण पुढे करून सेवानिवृत्तांची चेष्टा केली जात आहे. त्वरीत निवृत्ती वेतनासोबतच हप्त्याची रक्कम न दिल्यास सर्व सेवानिवृत्त कर्मचारी शिक्षण मंडळाच्या कार्यालयात आंदोलन करतील असा इसारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. आंदोलनासाठी तयार राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष नथुजी देवरे, का. बा. सुतार, उत्तमराव देवरे आदींनी केले आहे.