* कापसाऐवजी सोयाबीनच्या पेऱ्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता!
या वर्षीच्या खरीप पेरणीसाठी जिल्हास्तरीय कृषी खात्याने अदूरदर्शी नियोजन जाहीर केले आहे. कृषी विभागाने जिल्ह्य़ातील ७ लाख ६१ हजार हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी सर्वाधिक म्हणजे २ लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस तर त्यापाठोपाठ २ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी गृहीत धरली आहे. प्रत्यक्षात पर्जन्यमानाची अनियमितता, बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांचे वाढलेले भाव, पीक उत्पन्नासाठी येणारा मशागत व अन्य खर्च, होणारे सरासरी उत्पन्न, शेतमालाचे हमीभाव या सगळय़ा बाबी लक्षात घेता बेभरवशाचे असलेल्या कापसाचा पेरा घटून हमीचे रोख पीक असलेल्या सोयाबीनचा पेरा मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे.
 कृ षी खात्याच्या खरिपाच्या चुकीच्या नियोजनामुळे सोयाबीन, उडीद, मूग, तूर या बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन त्याचा मोठय़ा प्रमाणावर काळा बाजार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कृषी विभागच बियाण्यांच्या काळय़ा बाजाराला चालना देतो, असा आरोप त्यामुळे करण्यात येत आहे. यावर्षी भेंडवळ घटमांडणीने कापसाचे पीक अनिश्चित असल्याचे भाकीत वर्तविले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी या भाकितावर विश्वास ठेवतात. त्यामुळे कापसाचा पेरा घटणार आहे. सुमारे पन्नास हजार हेक्टर कापसाचा पेरा घटेल, असा प्राथमिक अंदाज आहे. त्याला पर्याय म्हणून सोयाबीन, मूग, उडीद व तुरीचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीनच्या पेरा क्षेत्रामध्ये पंचवीस हजार ते चाळीस हजार हेक्टपर्यंत वाढ होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. यावर्षी पर्जन्यमान खात्याने भरपूर पाऊस येईल, अशी शक्यता वर्तविली आहे. पाऊस अधिक असला की, सोयाबीनचे पीक जोमदारपणे येते. त्याला हेक्टरी उत्पन्न उतारादेखील चांगला येतो. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनचे भाव बऱ्यापैकी वाढलेले आहेत. सोयाबीन हे हमखास येणारे व हमीचे रोखीचे पीक समजले जाते. त्यामुळे या वर्षी जिल्ह्य़ातील २ लाख ९० हजार हेक्टपर्यंत सोयाबीनचा पेरा जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार या वर्षी ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी होणार आहे. ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची, ४४ हजार हेक्टरवर मुगाची, ४२ हजार ५०० हेक्टरवर उडिदाची, ४० हजार हेक्टरवर मक्याची लागवड केली जाणार आहे. प्रत्यक्षात पाऊस लवकर सुरू होणार असल्याने मूग व उडिदाचा पेरा वाढणार आहे. तुरीच्या पेऱ्यातदेखील वाढ होणार आहे. वाढलेल्या या पेऱ्याच्या तुलनेत कापसासोबत ज्वारीचा पेराही घटणार आहे. मात्र पाऊस चांगला असल्यास व ज्या ठिकाणी पशुपक्ष्यापासून सुरक्षितता असेल त्या ठिकाणी मक्याचा पेरा वाढू शकतो. त्यामुळे कृषी विभागाचे नियोजन फसवे व अदूरदर्शी असल्याचे स्पष्ट होते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांच्या अधीनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची यंत्रणा गावपातळीवर जाऊन व प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन खरीप व रब्बी पीक पेरणीचे नियोजन करीत नाही. कार्यालयात बसून शासकीय सोपस्कार पूर्ण केले जाते. त्यामुळे हे नियोजन प्रत्यक्ष क्षेत्रीय परिस्थितीपेक्षा भिन्न असते, असे मत प्रगतिशील कास्तकार व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या बियाणे मागणीवरून कृषी खात्याचे नियोजन करण्यात येते. ते फार काही वस्तुस्थितीदर्शक नसते, असे मत कृषी खात्याच्या एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले. कृषी विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे बियाण्यांचा तुटवडा व काळाबाजार यांना चालना मिळते, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले.