शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीकडे वळविण्याच्या उद्देशाने खरीप हंगामात दहा टक्के क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या  कृषी विभागाने केले आहे.
हिरवळीच्या खताकरिता असलेल्या ढेंचा या बियाण्यांवर ५०टक्के अनुदान जाहीर करण्यात आले आहे. रासायनिक खताच्या वापरामुळे दिवसेंदिवस जमिनीचा पोत खालावत आहे. रासायनिक खताचा वापर टाळल्यास जमिनीचा पोत सुधारता येऊ शकतो. जमिनीचा पोत सुधारण्याकरिता शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळणे आवश्यक आहे. या खरीप हंगामात किमान दहा टक्के क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणण्याचा प्रयत्न आहे. ढेंचा हे बियाणे वापरून शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करावी म्हणून या बियाण्यांवर ५० टक्के अनुदान देण्यात आले आहे. ढेंचा बियाण्यांची किंमत ४ हजार ४०० प्रती क्िंवटल याप्रमाणे असून त्यावर अनुदान देण्यात आल्याने हे खत २२०० रुपयात शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना वेळेत या बियाणांचा पुरवठा व्हावा म्हणून जिल्हय़ातील सर्व पंचायत समित्यांमध्ये ३६३ क्विंटल पुरवठा करण्यात आला आहे. हे बियाणे प्रतिएकर २० किलो याप्रमाणे वापरायचे असून या २० किलोच्या पिशवीची मूळ किंमत ८८० रुपये आहे. शेतकऱ्यांसाठी ही पिशवी ४४० रुपयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी  प्रतिपिशवी ४४० रुपये प्रमाणे रक्कम व सबंधित शेतीचा सातबारा पंचायत समितीकडे जमा करावा, असे आवाहन कृषी समिती सभापती अरुण निमजे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख, कृषी अधिकारी प्र. शा. भक्ते यांनी केले आहे.