नाबार्ड पुरस्कृत व ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ कुरखेडा या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली नवरगावचे कृषी शेतकरी मंडळ गाव विकासाकरिता अनेक उपक्रम मागील एक वर्षांपासून राबवित आले आहे. गावाच्या विकासाचा संकल्प मनाशी बांधून वेगवेगळ्या विभागातील तज्ज्ञ व साधन व्यक्तींना गावात पाचारण करून गावातील लोकांच्या ज्ञानात अधिक भर पडावी यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून नुकतेच नवरगाव येथे गाव विकासासंबंधी चर्चा, कृषी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेने मुंबईच्या टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसमधील विद्यार्थ्यांकडून नवरगावचे पूर्ण  नियोजन करवून घेतले. त्याचा पाठपुरावा म्हणून हा कार्यक्रम घडवून आणण्यात आला.
यात यापूर्वी विद्यार्थ्यांनी काढलेल्या गरजांचे आकलनावर गावासमोर मांडणी करून प्रत्येक गरजावर विस्तृत चर्चा करण्यात आली व कोणती गरज गावासाठी किती महत्त्वाची आहे, यावर एकमत होऊन प्रथम गावासाठी स्मशानभूमी, दुसरे धान्यकोठार, तिसरे शौचालय व चौथे कागदी पत्रावळ उद्योग, अशा प्रकारे तेरा गरजांचे आकलन होऊन प्राधान्यक्रम देण्यात आले. यावेळी उपसरपंच संजय कवाडकर यांनी अध्यक्ष म्हणून मोलाची भूमिका पार पाडली.
याप्रसंगी तंटामुक्त समिती आंधळी नवरगावचे अध्यक्ष प्रसाद खुणे यांनी कृषी शेतकरी मंडळानी केलेल्या कार्याचे कौतुक करून मंडळाने व्यावसायिक दृष्टिकोन बाळगून परिसरातील अडचणींचा विचार करून राईस मिल व्यवसाय उभारण्याचे सूचविले. त्याचप्रमाणे जयदेव बन्सोड प्रकल्प समन्वयक आम्ही आमच्या आरोग्यासाठी यांनी आपल्या मार्गदर्शनातून शेती विकासासंबंधाने नाबार्डची भूमिका व शेतकरी मंडळाकरिता असणाऱ्या योजनांची माहिती देऊन शेतकरी मंडळांनी आपल्या कामाची व्याप्ती ‘नियोजन-कृती-पाठपुरावा’ या त्रिसुत्रीचा वापर करून सांघिक प्रयत्नावर भर द्यावा, यावर प्रकाशझोत टाकला. संस्थेचे प्रदीप सौदागर यांनी आपल्या भाषणातून शेती विकास पीक संरक्षण याबरोबरच शेतकरी महिला-पुरुषांचे आरोग्य यावर प्रकाश टाकला, तसेच संभाषणापेक्षा कृतीवर अधिक भर देऊन संस्थेचे क्षेत्रीय समन्वयक प्रकाश मेश्राम यांनी पिकावर होणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दशपर्णी अर्क सर्व शेतकऱ्यांनी वापर करावा, यासाठी प्रात्यक्षिकाद्वारे गाववासीयांना तयार करून दाखविले. प्रास्ताविक प्रकाश मेश्राम यांनी केले. संचालन व आभार नवरगावचे जीवन जुमनाके यांनी मानले.
गडचिरोली जिल्ह्य़ामध्ये आम्ही आमच्या आरोग्यासाठी ही संस्था २८ वर्षांपासून आरोग्य, उपजीविका, शिक्षण, महिला व किशोरी सबलीकरण, अपंगांसाठीचे कार्य इत्यादी विषयांवर चर्चा करीत आहे. उपजीविकेसंबंधाने शेतकरी व बिगर शेतकरी व गावाचा शाश्वत विकास व्हावा, आधुनिक माहिती व तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहचावे, यासाठी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कुरखेडा तालुक्यात नाबार्ड पुरस्कृत १० शेतकरी मंडळांची स्थापना झालेली आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून कृषी शेतकरी मंडळ नवरगावने गाव विकासासंबंधी चर्चा, कृषी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.