ऐरोली सेक्टर आठमधील शिवसेना शाखेच्या ‘जहागिरी’वरुन शिवसेनेचे दोन सातारकर नेते पालकमंत्री एकनाथ शिंदे व पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यात चांगलीच जुंपल्याचे समजते. विशेष म्हणजे, या दोन नेत्यांमध्ये ‘तू तू मै मै’ होण्याचे कारण राष्ट्रवादीला रामराम ठोकून सेनेत दाखल झालेले ऐरोलीतील नगरसेवक एम. के. मढवी हे आहेत. मढवी यांच्या सेना आगमनापासून अस्वस्थ असलेल्या चौगुले यांनी पालकमंत्र्यांनाही दोन खडे बोल सुनावल्याने सेनेत चांगलीच खळबळ माजली आहे.
ऐरोली सेक्टर आठमधील शिवशंकर प्लाझा इमारतीतील तळमजल्यावर शिवसेनेची ऐरोली मध्यवर्ती शाखा आहे. वीस वर्षांपूर्वी या जमिनीवर शिवसेनेची दिवा शाखा दिमाखात उभी होती, ही शाखा या गावातील शिवसैनिकांनी श्रमदानाने बांधली होती. त्यामुळे या शाखेशी अनेक शिवसैनिकांचे ऋणानुबंध बांधले गेले होते. सिडकोने ही जमिन संपादित केली असल्याने एका अर्थाने ही शाखा अनधिकृत होती. सिडकोने या शाखेचा भूखंड एका विकासकाला निविदेद्वारे ‘जैसे थे’ स्थिती विकला. या विकासकाने तो स्वस्त दरात घेतला, मात्र त्याच्यासमोर शिवसेना शाखा हटविण्याचे मोठे आव्हान होते. त्याने ही शाखा जमीनदोस्त करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद हे धोरण वापरुन एका रात्रीत ही शाखा जमीनदोस्त केली. त्यासाठी मातोश्रीपासून काकाश्रीपर्यंत सर्वाना लक्ष्मीदर्शन घडविण्यात आले होते. त्या बदल्यात पहिल्या मजल्यावर शाखेला कार्यालय देण्याचे ठरले होते. कालांतराने मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या भूखंडावर या विकासकाने लगेच बांधकाम सुरू केले. तळमजल्यावर दुकाने काढून गडगंज पैसा कमविण्याच्या हेतुने त्याने तळमजल्यावर शाखा देण्याचे टाळले होते. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक विजय चौगुले यांनी माजी मंत्री गणेश नाईक यांना शह देऊन सेना प्रवेश केला होता. त्यांच्या गळ्यात नवी मुंबई जिल्हाप्रमुखाची माळ घालण्यात आली होती. ही जबाबदारी आल्यावर चौगुले यांनी सर्वप्रथम ही शाखा ताब्यात घेतली. विकासकाशी झालेलया करारानुसार पहिल्या मजल्यावर शाखेसाठी जागा न घेता चौगुले यांनी एका रात्रीत तेथील एका दुकानाचा ताबा घेतला. ही जागा अंत्यत मोक्याची व प्रशस्त आहे. दुमजली दुकान असलेली ही मालमत्ता आजच्या घडीला कोटय़ावधीची असून विकासकाने ती एका ग्राहकाला विकली आहे, मात्र सेनेची शाखा हटविण्याची हिंमत या उत्तर भारतीय विकासकाने दाखविली नाही. त्यामुळे गेली दहा वर्षे ही शाखा ऐरोलीची मध्यवर्ती शाखा झाली होती. चौगुले जिल्हाप्रमुख असल्याने त्यांची उठबस या शाखेत जास्त असल्याने तिला महत्व प्राप्त झाले होते. काही दिवसापूर्वी एका बलात्कार प्रकरणात आरोप झाल्याने चौगुले यांचे जिल्हाप्रमुखपद गेले. पालिका निवडणुकीत स्वत:चे सहा नातेवाईक व निकटवर्ती असे दहा बारा नगरसेवक निवडून आणल्याने त्यांची पक्षातील ताकद स्पष्ट झाली. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यावाचून पक्षाला दुसरा पर्याय नव्हता. यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्वाची होती. चौगुले यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाला अद्याप सक्षम जिल्हाप्रमुख मिळालेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची माळ गळ्यात पडलेल्या चौगुले यांचा वावर सध्या जिल्हाप्रमुखासारखाच आहे. नाईक यांचा मानसपुत्र म्हणून ओळखले जाणारे नगरसेवक एम. के. मढवी यांनी पालिका निवडणूकीच्या काही दिवस अगोदर अचानक सेनेत उडी मारली आणि त्यांनी त्यांच्या तीन जागा निवडून आणून दाखविल्या. त्यामुळे त्यांचेही पक्षातील वजन वाढले. सेनेची ती वादग्रस्त शाखा मढवी यांचा मुलगा करण मढवी याच्या प्रभागात येते. त्यामुळे मढवी यांची सध्या त्या शाखेत दररोज हजेरी सुरू झाली आहे. चौगुले जिल्हाप्रमुख असताना ज्या खूर्चीत बसत होते. त्याच खुर्चीत मढवी आता न्यायनिवाडा करीत आहेत. त्यामुळे हाडवैर असलेल्या चौगुले यांची आग मस्तकाला गेली आहे. जून्या शाखेजवळील फेरीवाल्यांवरुनदेखील या दोघांच्यात शाब्दीक चकमक झडली होती. शाखेच्या सुभेदारीवरुन शिंदे यांनी चौगुले यांच्याकडे विचारणा केली असता या दोघांची मागील आठवडय़ात चांगलीच जुंपली होती. त्यात दोघांच्यात शिवीगाळ देखील झाली. त्यामुळे ‘दो हंसो का जोडा बिझड गयो रे’ असे चित्र सध्या दिसत आहे. या संर्दभात चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता ते व्यग्र असल्याचे सांगण्यात आले तर पालकमंत्र्याशी संपर्क होऊ शकला नाही.