मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या वेशीवर उभारण्यात आलेले पाचही टोलनाके वाहतूक कोंडीचे आगार ठरू लागले असून या टोलनाक्यांवर आधीच पैसे भरून हैराण झालेल्या प्रवाशांना इंधनावरील खर्चाचा अतिरिक्त भार सोसावा लागत असल्याने हे विकतचे दुखणे आता नकोसे होऊ लागले आहे. ऐरोली, वाशी, मुलुंड आणि दहिसर अशा टोलनाक्यांवर सकाळ-सायंकाळी गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात. अरुंद आणि अपुऱ्या मार्गिकांच्या नियोजनाअभावी या टोलनाक्यांचे रुंदीकरणही आता शक्य राहिलेले नाही. टोल कोंडीवर उपाय म्हणून वाशी खाडीपुलास लागून पथदर्शी असा टोलनाका उभारण्यात आला. मात्र तेथेही मोठय़ा प्रमाणावर कोंडी होत असल्याचे चित्र आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुलुंड हे टोलनाके सर्वाधिक कोंडीचे ठरू लागल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.  ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण जिल्ह्य़ातील प्रवाशांना जागोजागी उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांनी हैराण करून सोडले आहे. मुंबईत उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलांचा खर्च वसूल करण्यासाठी शहराच्या वेशीवर हे टोलनाके उभारण्यात आले. या टोलनाक्यांचा सर्वाधिक फटका ठाणे, नवी मुंबईतील रहिवाशांना बसला आहे. मुंबईत रहाणाऱ्या नागरिकांकडूनही शहरातील उड्डाण पुलांचा वापर होतो. मात्र या उड्डाण पुलांचा खर्च मात्र ठाणे, नवी मुंबईकरांकडून अधिक प्रमाणात वसूल केला जातो, असे चित्र आहे. ठाणेकरांना तर चहूबाजूंनी टोलनाक्यांनी घेरले आहे. आनंदनगर, मॉडेला चेकनाका, घोडबंदर, खारेगाव अशा चारही दिशांनी ठाणेकर टोलच्या चक्रव्यूहात सापडले आहेत. हे टोलनाके उभारताना भविष्यात वाढणाऱ्या वाहनांचा पुरेसा अभ्यास करणे खरे तर गरजेचे होते. मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे टोल तर भरावाच लागतो, शिवाय इंधनाचा अतिरिक्त भरुदडही वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.

मुलुंड, दहिसर सर्वाधिक कोंडीचे नाके
पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर उभारण्यात आलेला टोलनाका तर वाहतूक कोंडी आणि नियोजनशून्यतेचे मोठे उदाहरण ठरले आहे. ठाण्यातील आनंदनगर चेकनाक्यापासून या टोलनाक्याकडे येणारा रस्ता अतिशय निमुळता असून या रस्त्यास लागूनच मुंबई महापालिकेचा जकात नाका तसेच क्षेपणभूमी आहे. त्यामुळे मुलुंड टोलनाक्याची उभारणी करताना क्षेपणभूमीकडे येणाऱ्या कचरा गाडय़ांचा विचार होणे गरजेचे होते. प्रत्यक्षात तसे झालेले नाही. सकाळच्या वेळेत ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा आकडा बराच मोठा असतो. त्याच वेळी मुंबईकडून क्षेपणभूमीकडे येणाऱ्या मोठय़ा वाहनांचा राबताही मोठा असतो. मुंबईचा कचरा वाहून नेणारी ही वाहने ठाण्याकडील मार्गावर वळसा घेऊन क्षेपणभूमीकडे जातात. त्यामुळे टोलनाक्याकडे जाणाऱ्या वाहनांना अडथळा होतो. ठाण्याहून टोलनाक्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गाचे सध्या रुंदीकरण केले जात असले तरी टोलनाक्यांवरील मार्गिकांची संख्या कमी असल्याने या टोलनाक्यावरील विकतचे दुखणे यापुढेही कायम राहिले, असे सध्याचे चित्र आहे. या टोलनाक्याच्या दोन्ही बाजूस खासगी गृहसंकुले उभी असल्याने येथे मार्गिका वाढविणेही शक्य नाही. मुलुंडपाठोपाठ दहिसर टोलनाकाही वाहतूक कोंडीच्या जंजाळात सापडला असून मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता हा टोलनाका ओलांडताना गर्दीच्या वेळेत ३० मिनिटांचा कालावधी लागत आहे.  

navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
Traffic Causes Jam, continuous Holidays, Tourists Head, Lonavala, Mumbai Pune Expressway, marathi news,
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल
Mumbai to Pune share cab fares
मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ होणार