‘संगीत बारी’ या कलाप्रकारातील हे कलाकार मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागांतील रसिकांना माहिती व्हावेत, त्यांची ही कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावी, त्यायोगे या कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण करून द्यावे आणि मदतही मिळावी, यासाठी कार्यक्रमाची निर्मिती केली, असे निर्माते अजित भुरे यांनी सांगितले.
 ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ उपक्रमाअंतर्गत अजित भुरे यांच्या ‘ट्रस्ट द थेस्पियन’तर्फे निर्मित ‘संगीतबारी’ या आगळ्या कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. चौघींचा लखलखत्या ‘सौदामिनी’सारखा नृत्याविष्कार, पदलालित्य आणि अदाकारीने तसेच संगीतसाथ करणाऱ्या अवघ्या तीन साथीदारांच्या समर्थ साथीने शनिवारी प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्टय़ांचा पाऊस पडला व यातून ‘संगीतबारी’ उत्तरोत्तर रंगत गेली.. या कार्यक्रमापूर्वी ‘लोकसत्ता’चे फीचर एडिटर रवींद्र पाथरे यांनी भुरे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते.
महाराष्ट्रात आज सुमारे ४५ संगीतबारी कलाकेंद्रे आहेत. येथे अनेक पाटर्य़ा आपली लावणी कला सादर करत असतात. शहरी भागातील प्रेक्षकांना याबाबत केवळ ऐकीव माहिती असते त्यांनी ते अनुभवलेले नसते. अशा नागर प्रेक्षकांसाठी ‘संगीतबारी’ म्हणजे काय याची ओळख करून देण्यासाठी या कार्यक्रमाची निर्मिती झाली असून ही आगळीवेगळी ‘संगीतबारी’ शहरी प्रेक्षकांसमोर येण्यासाठी ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे.
‘संगीतबारी’च्या या पहिल्या प्रयोगात संगीत नाटक कला अकादमी पुरस्कार विजेत्या शकुंतलाबाई नगरकर, मोहनाबाई महाळंग्रेकर, प्रियांका कला केंद्र (सातारा)येथील गीता लाखे-वाईकर, पुष्पा सातारकर आणि ‘आर्यभूषण थिएटर’ (पुणे)चे चंद्रकांत लाखे (पायपेटी), सुनील जावळे (तबला), सुमीत कुडाळकर (ढोलकी) यांनी ‘संगीतबारी’चा दणका उडवून दिला. कार्यक्रमाचे लेखन भूषण कोरगावकर यांचे तर दिग्दर्शन सावित्री मेधातूल यांचे होते.
‘एकटीच मी नसे सोबती, मनात ही हुरहुर’ या लावणीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शकुंतलाबाई नगरकर यांनी ‘नेसली पीतांबर जरी’ ही लावणी अशा काही नजाकतीने आणि अदाकारीने सादर केली की संपूर्ण सभागृह फक्त नाचायचे बाकी राहिले होते.    
‘संगीतबारी’ पाहताना खूप मजा आली
‘लोकसत्ता संपादक शिफारस’ या उपक्रमाअंतर्गत ‘संगीतबारी’ तुम्ही सर्वसामान्य पांढरपेशा प्रेक्षकांपर्यंत घेऊन आलात. त्यामुळे ‘संगीतबारी’ म्हणजे नेमके काय, हे पाहायला आणि अनुभवायला मिळाले.
         -दीपाली विचारे  (नृत्य दिग्दर्शिका)         

 ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ या उपक्रमाअंतर्गत सादर झालेला हा प्रयोग अभिनंदनीय आहे. त्यामुळे तमाशा व संगीतबारीतील कलाकारांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
    -अरुण शेवते (ऋतुरंग प्रकाशन)
कार्यक्रमातील सर्वच कलाकार, संगीत साथीदार आणि निवेदक यात कोणतीही खोट काढण्यासारखे काहीही नाही. शकुंतलाबाई नगरकर व मोहनाबाई महाळंग्रेकर यांचा या वयातील उत्साह, नृत्याविष्कार याला सलाम.
    -रोहिणी गोविलकर (प्रेक्षक)

‘संगीतबारी’चा प्रयोग स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. ‘लोकसत्ता’सारख्या वृत्तपत्राच्या माध्यमातून ही कला आणि कलावंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास त्यामुळे मोलाची मदत होणार आहे.
    -सुशील नरसियन (प्रेक्षक)

तमाशा, लावणी किंवा लोककलावंतांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा आहे. ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ या उपक्रमाच्या माध्यमातून या कलेला एक चांगली प्रतिष्ठा तसेच या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले आहे.
-माजिद तांबे (आर्यभूषण थिएटरचे मालक)

‘संगीतबारी’च्या निमित्ताने तरुण पिढीपर्यंत हा कलाप्रकार पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. त्याला सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद द्यावा.
-शकुंतलाबाई नगरकर

‘संगीतबारी’ हा कलाप्रकार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा, या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम तयार केला आहे. या कलाकारांचे सामाजिक, आर्थिक आणि कला विश्व कार्यक्रमातून उलगडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
-सावित्री मेधातूल (‘संगीतबारी’च्या दिग्दर्शिका)

या उपक्रमाच्या माध्यमातून शहरी भागातील सुजाण, सुसंस्कृत आणि सुशिक्षित आणि ज्यांना ‘संगीतबारी’विषयी काहीही माहिती नाही, त्यांना याची ओळख करून देण्याचे काम होणार आहे.  -मोहनाबाई महाळंग्रेकर (‘संगीतबारी’तील  
            मुख्य कलाकार)

‘संगीतबारी’ या कलाप्रकाराबद्दल शहरी भागातील रसिकांना फारशी माहिती नाही. या आगळ्या कलाप्रकाराची आणि यातील कलाकारांची ओळख रसिकांना करून देणे आणि ‘संगीतबारी’ रसिकांपर्यंत पोहोचविणे हा या कार्यक्रमाच्या निर्मितीमागचा मुख्य उद्देश आहे.  -अजित भुरे
निर्माते व ‘ट्रस्ट द
थेस्पियन’संस्थेचे प्रमुख