शहरात सर्व सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक झाले आहेत. त्यासाठी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली. तशा प्रकारच्या सूचना संबंधितांना दिल्या.
आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत जिल्ह्य़ातील विकास कामांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, विभागीय आयुक्त अनुपकुमार, नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे, पोलीस आयुक्त के.के . पाठक, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग, मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे आदी उपस्थित होते.
नागपूरसारख्या शहरात मोठय़ा प्रमाणात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यास पोलिसांना मदत होईल. यासाठी निधी मंजूर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच पोलीस विभागास जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वाहनांसाठी निधी द्यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हा नियोजन समित्यांना ३५ टक्के निधी वितरित करण्यात आला आहे. ६० टक्के निधी संपूर्ण राज्यात वितरित करण्यात येऊन १५ ऑगस्टनंतर कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने नियोजन समितीच्या कामांना मान्यता घेऊन कामे सुरू करण्याच्या सूचनाही पवार यांनी केल्या. तसेच २० कोटींचा निधी वसंतराव नाईक जन्मशताब्दीनिमित्त ऑडिटोरियम बांधण्यासाठी मंजूर केला आहे.
या ऑडिटोरिमची आसनक्षमता १५०० इतकी असावा आणि तो अतिशय दर्जेदार व देखणा बांधण्यात यावा, असेही त्यांनी सुचविले. नागपुरात प्रस्तावित नियोजन भवन उत्तम दर्जाचे बंधण्यात यावे, सर्व शासकीय कार्यालयांना या भवनाचा उपयोग व्हावा अशा पद्धतीने त्याची रचना असावी. वर्धा येथे भूसंपादनासाठी १५ कोटी रुपये देण्याचे आदेश त्यांनी बैठकीत दिले.
या बैठकीत पाणीटंचाई, बी-बियाणे, पीक परिस्थिती, आरोग्य व्यवस्था आदी कामांचाही आढावा घेतला. पाहुण्यांचे स्वागत जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी केले. उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार उपाध्यक्ष चिखले यांनी केला.