विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह इच्छुकांनीही विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी त्यांच्या गणेश मंडळांकडे पाठ फिरवून मुंबईत ठाण मांडले  आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धामधून असली तरी त्यापैकी काहींनी तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच मुंबई सोडण्याचा निर्धार केला आहे.
विदर्भातील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये राजकीय नेत्यांचा सहभाग वाढला असून ते या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत. कारण, गणेशोत्सव होत नाही तोच राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे. विविध राजकीय पक्षातील इच्छुकांच्या मुलाखतीचा पहिला टप्पा उपराजधानीत आटोपल्यावर दुसरा आणि अंतिम टप्पा मुंबईत होत असल्याने विदर्भात एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना गणेश मंडळांशी संबंधित  नेते मात्र मुंबईत उमेदवारीसाठी ठाण मांडून बसले आहेत. मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखती आटोपल्यावर उमेदवारांच्या यादीचे काम सुरू असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या गॉडफादरच्या माध्यमातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे. मुंबईत ठाण मांडल्याशिवाय उमेदवारी मिळणार नाही, अशी इच्छुकांची धारणा झाल्यामुळे काहींनी त्यांच्या गणेशोत्सवांकडेही पाठ फिरवली आहे.
पश्चिम नागपूरमधून काँग्रेसकडून राजेंद्र मुळक की विकास कुंभारे, यांच्यामध्ये चांगलीच चुरस आहे. मुळक हे मुख्यमंत्र्याचे जवळचे, तर ठाकरे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे खंदे समर्थक आहेत. गेल्या काही दिवसात चव्हाण आणि मुत्तेमवार यांच्यामधील वाद सर्वश्रूत असल्यामुळे पश्चिम नागपूरची जागा आता दोघांसाठीही प्रतिष्ठेची झाली आहे. याशिवाय, अन्न व नागपूर पुरवठा मंत्री अनिल देशमुख हे पुत्र सलिलसाठी पश्चिम नागपुरातूनच आग्रही आहेत. दीनानाथ पडोळे, नितीन राऊत, माजी मंत्री अनिस अहमद, सतीश चतुर्वेदी, प्रफुल्ल गुडधे पाटील, राजा द्रोणकर, शेख हुसेन, जयप्रकाश गुप्ता आदी काँग्रेसचे नेते मुंबईत आहेत. राष्ट्रवादीला शहरात आणि जिल्ह्य़ात तीन-तीन जागा मिळाव्या, यासाठी पक्षाचे काही इच्छुक नेत्यांच्या मुंबई वाऱ्या सुरू असून यासाठी ते मोर्चेबांधणीत व्यस्त आहेत. आमदार प्रकाश गजभिये दरवर्षी मोठय़ा प्रमाणात गणेशोत्सव साजरा करतात. मात्र, यावेळी हा उत्सव सोडून ते मुंबई-नागपूर वाऱ्या करीत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही इच्छुक नेत्यांनी जोपर्यंत उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडायचीच नाही, असा निर्धार केला आहे.
भाजप-शिवसेनेतही हेच चित्र आहे. भाजपचे काही प्रस्थापित आमदार पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी गॉडफादर माध्यमातून सक्रिय झाले आहेत. कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, छोटू भोयर, यशवंत बाजीराव, भोला बढेल, धर्मपाल मेश्राम, प्रभाकर येवले, संदीप गवई, चंद्रशेखर बावनकुळे, विजय घोडमारे, संध्या गोतमारे, सुधीर पारवे यांच्यासह काही इच्छुकांच्या नागपुरातील वाडा आणि बंगल्यावर चकरा वाढल्या असल्या तरी उमेदवारांची अंतिम यादी मात्र मुंबईत तयार केली जाणार असल्यामुळे त्यांचीही मुंबईत ये-जा वाढली आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थित मनसेच्या इच्छुक उमेदवारांच्या नुकत्याच मुलाखती झाल्यानंतर अंतिम यादीत नाव असावे, यासाठी काही इच्छुक मुंबईतच आहेत.
विविध राजकीय पक्षातील इच्छुकांच्या मुंबईवारीमुळे या साऱ्यांनी लाडक्या गणरायाकडे मात्र दुर्लक्ष केले, हे मात्र तितकेच खरे.