अगदी अखेरच्या टप्प्यात महायुती आणि आघाडी तुटल्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसच्या ताब्यातील सहा, काँग्रेसला राष्ट्रवादीच्या ताब्यातील आठ, भाजपला शिवसेनेच्या कोटय़ातील नऊ तर शिवसेनेला भाजपच्या कोटय़ातील सहा जागांवर तातडीने उमेदवार उभे करण्याचे आव्हान पेलताना कसरत करावी लागली. त्याची पूर्तता करताना पदाधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली असून बहुतांश उमेदवारांना पक्षाचे अधिकृत पत्र हाती नसताना अर्ज दाखल करावे लागले.
आघाडी वा महायुतीकडून आधी जे इच्छुक होते, अथवा ज्यांना तिकीट मिळणे निश्चित होते, त्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर पक्षातर्फे अर्ज भरताना काहीशी चिंतेची लकेर उमटल्याचे जाणवले. इतकेच नव्हे तर आघाडी वा युतीतर्फे जे आधी लढण्यास इच्छुक होते, त्यातील काही फाटाफुटीमुळे ऐनवेळी माघार घेण्याच्या मानसिकतेत गेल्याने राजकीय पक्षांची अडचण झाली. अशा इच्छूकांना अर्ज भरण्यास सूचित केले गेले असले तरी काहींनी ऐनवेळी हात आखडता घेतल्याची काही उदाहरणे आहेत. मागील वेळी शिवसेनेने इगतपुरी, सिन्नर, मालेगाव बाह्य, नांदगाव, येवला, निफाड, देवळाली, नाशिक मध्य आणि दिंडोरी या नऊ मतदारसंघांत निवडणूक लढवली होती. या जागांसह भाजपच्या कोटय़ातील चांदवड, सटाणा, कळवण, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व व मालेगाव मध्य मतदारसंघात त्यांना उमेदवार देणे क्रमप्राप्त ठरले आहे. भाजपला गतवेळी शिवसेनेच्या कोटय़ात असणाऱ्या जागांवर उमेदवार उभे करावे लागणार आहेत. या अनुषंगाने काही दिवसांपूर्वीच पक्षाने चाचपणी केली होती. यामुळे भाजपला इतर पक्षांच्या तुलनेत उमेदवार शोधताना कमी कष्ट पडले.
आघाडीतील बेबनावावर तोडगा न निघाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीची यापेक्षा वेगळी अवस्था नव्हती. गतवेळी राष्ट्रवादीने येवला, नांदगाव, चांदवड, नाशिक पश्चिम, देवळाली, मालेगाव बाह्य़, निफाड, दिंडोरी या आठ जागा लढविल्या. आता त्यांना गतवेळी काँग्रेसकडे असणाऱ्या सिन्नर, इगतपुरी, मालेगाव मध्य, नाशिक मध्य, नाशिक पूर्व व बागलाण अशा सहा जागांवर उमेदवार द्यावे लागणार आहेत. काँग्रेसची सर्व जागांवर उमेदवार शोधताना दमछाक झाली आहे. कारण, त्यांना आठ जागांवर उमेदवार द्यायचे आहेत. अल्पावधीत प्रबळ उमेदवार शोधणे चारही पक्षांसमोर आव्हान ठरले. दुसरीकडे लढण्यासाठी सर्व जागा खुल्या झाल्यामुळे चारही पक्षांत इच्छुकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. काही मतदारसंघांत विद्यमान आमदारांनी उडय़ा मारल्याने त्या त्या पक्षांचे काम काहीसे हलके झाले आहे.
गतवेळी अपक्ष म्हणून निवडून आलेले शिरीष कोतवाल हे आता काँग्रेसमध्ये तर तिसरा महाजचे आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल राष्ट्रवादीमध्ये, सिन्नरचे काँग्रेसचे आमदार माणिक कोकाटे हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे त्या त्या पक्षांचा भार काहीसा हलका झाला. उमेदवारी जाहीर झाली नसल्यामुळे शहरातील चारही मतदारसंघांत भाजपतर्फे कोणी अर्ज भरला नाही. काही जागांवर दुसऱ्याला तिकीट दिल्यामुळे नाराज इच्छुकांनी अन्य पक्षांत जाऊन बंडखोरीचे निशाण फडकविले. अखेरच्या टप्प्यातील या घडामोडींमुळे निवडणुकीत विलक्षण रंग भरले असले तरी युती व आघाडीत आधी सामावलेल्या पक्षांमध्ये कमालीचा गोंधळ उडाला आहे.