प्रत्येक राजकीय पक्षाचा कणा हा कार्यकर्ता असल्यामुळे त्यांच्या भरवशावर अनेक नेते मोठे झाले असताना आज मात्र आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. चारही पक्ष स्वबळावर लढले तर नेमका ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांला पडला आहे.
गेल्या काही वर्षांत विविध राजकीय पक्षांमध्ये नेते वाढले आहेत. कार्यकर्त्यांची संख्या कमी झाल्यामुळे नेत्यांना निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते मिळेनासे झाले आहेत. राजकीय पक्षात चार पाच वर्षे काम केले की त्यांच्या अपेक्षा वाढतात आणि कार्यकर्ता नेता होतो. राजकीय पक्षांतील नेत्यांकडे जे काही कार्यकर्ते काम करीत असतात त्यांना सांभाळून ठेवण्यासाठी ‘खुश’ ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर आघाडी आणि महायुती एकत्र येऊन प्रचार सुरू करतील, अशी अपेक्षा असताना अजून जागा वाटपावरून घोळ सुरू आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात आहे. साधारणत: भाजप- शिवसेना आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये कार्यकर्ते वेगवेगळे असले तरी गेल्या काही वर्षांत महायुती आणि आघाडी हे दोनच प्रमुख राजकीय पक्ष निवडणूक लढवित असल्यामुळे कार्यकर्ते विभागले गेले नव्हते. मात्र, आघाडी आणि महायुती एकत्र आले नाही आणि चारही पक्ष स्वबळावर लढतील तर त्यात कार्यकर्त्यांची मात्र गोची होणार आहे.
शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एका विचारांचे असल्यामुळे ते एकत्रित येऊन प्रचार करीत होते. मात्र, दोन्ही पक्ष जर स्वबळावर लढले तर कार्यकर्ते विभागले जातील आणि त्याचा फटका नेत्यांना पडणार असल्याची चिन्हे आहेत. या सर्व घडामोडीवर कार्यकर्ता आज संभ्रमात असून त्याला नेमके कोणाकडे जावे हे कळत नाही. त्यामुळे तो द्विधा मनस्थितीत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हीच परिस्थिती आहे.
पूर्वी निवडणुकींमध्ये निष्ठेने आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात होती. मात्र, काळानुसार कार्यकर्ता बदलला असून तो व्यावसायिक झाला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाची ताकद कार्यकर्ता असल्यामुळे त्यांना टिकवून ठेवणे ही आज प्रत्येक पक्षासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. घरोघरी जनसंपर्काच्या प्रचारासाठी उमेदवारांच्या पाठीशी कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची फौज आवश्यक झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इच्छुक उमेदवारांना कार्यकर्ते टिकवून ठेवणे गरजेचे झाले आहे.