त्र्यंबकेश्वर नगरपालिका हद्दीतील घनकचरा नाशिक महापालिकेने स्वीकारण्यास कमालीचा विरोध झाल्यानंतर अखेर या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पालिका आयुक्तांना देण्याचा निर्णय गुरुवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. दरम्यान, सिडको-सातपूर स्वतंत्र महापालिका करावी या मागणीसाठी नगरसेवक दिनकर पाटील व नगरसेविका लता पाटील यांनी सभागृहात ठिय्या मारुन सुरू केलेले आंदोलन सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. शुक्रवारी दुपापर्यंत हे आंदोलन केले जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत एलईडीसह त्र्यंबकच्या घनकचरा विषयावर जोरदार चर्चा झाली. आयुक्तांनी त्र्यंबक नगरपालिका हद्दीतील घनकचरा नाशिक महापालिकेच्या खत प्रकल्पावर स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्र्यंबक नगरपालिका हद्दीत धार्मिक विधीतून निर्माण होणारे निर्माल्य हरीत लवादाच्या निर्देशानुसार सहा महिन्यांसाठी नाशिक महापालिकेच्या खत प्रकल्पावर स्वीकारले जात आहे. हे निर्माल्य स्वीकारण्यास महापालिकेने आधीच विरोध दर्शविला होता. त्याची पुनरावृत्ती घनकचरा स्वीकारण्याच्या मुद्यावरून झाली. आधीचा ठराव तत्कालीन आयुक्तांनी निलंबनासाठी शासनाकडे पाठविला. शासनाने तो स्वीकारून निर्माल्य स्वीकारण्याचे सूचित केले. पालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून खत प्रकल्पाची उभारणी केली आहे. हा घनकचरा स्वीकारला गेल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी दिला. शहरातील घनकचऱ्याचे ढीग खत प्रकल्पावर जमा होत असताना त्यात त्र्यंबकच्या घन कचऱ्याची भर टाकण्यास बहुतेकांनी विरोध दर्शविला. जवळपास तीन तास यावर वादळी चर्चा झाली. सभागृहातील विरोध लक्षात घेऊन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गटनेत्यांशी चर्चा केली. शासनाचे निर्देश स्वीकारणे बंधनकारक आहे. यामुळे सदस्यांनी सकारात्मक भूमिका ठेवावी, असे आवाहन केले. त्यानंतर गटनेत्यांशी ही बैठक आटोपल्यावर सभागृहातील वातावरण बदलले. घनकचरा स्वीकारण्याबाबतचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पालिका आयुक्तांना देण्यात येत असल्याचे महापौरांनी जाहीर केले. दरम्यान, सिडको-सातपूर भागासाठी स्वतंत्र महापालिकेची स्थापना करावी या मागणीसाठी नगरसेवक दिनकर पाटील आणि लता पाटील यांनी सभागृहात आंदोलन केले. सभागृहात सुमारे पाच तास चर्चा सुरू असताना संबंधितांनी आपले ठिय्या आंदोलन सुरू ठेवले. शुक्रवारी सकाळी हे आंदोलन मागे घेतले जाईल असे संबंधितांकडून सांगण्यात आले.