मध्य रेल्वेवरील यंत्रणेचा बिघाड झाल्यानंतर प्रवाशांची होणारी कुचंबणा हे नेहमीचे रडगाणे झाले असताना या वर्षीच्या मध्यात मुंबईतील प्रवाशांच्या सेवेत दाखल होणाऱ्या मोनोरेलमध्ये अशा समस्यांसाठी विशेष उपाययोजना असणार आहे. मोनोरेलमध्ये काही बिघाड झाल्यास अवघ्या पाच ते दहा मिनिटांत प्रवाशांची तातडीने सुटका होऊ शकेल. त्यासाठी बिघाड झालेली मोनोरेल खेचून नेणे वा शेजारच्या मार्गावर दुसरी गाडी आणून शिडय़ांच्या साह्याने प्रवाशांना त्या गाडीत नेण्याची व्यवस्था असणार आहे.
चेंबूर-वडाळा-संत गाडगेमहाराज चौक या २० किलोमीटर लांबीच्या मार्गावर मोनोरेलचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे २३०० कोटी रुपये असून चेंबूर-वडाळा हा ८.८ किलोमीटरचा पहिला टप्पा ऑगस्ट २०१३ मध्ये वाहतुकीसाठी सुरू होईल. या प्रवासासाठी सध्या प्रवाशांना खडतर रस्त्यांवर धावणाऱ्या बसमध्ये सुमारे ४० मिनिटांची दमछाक व गोंगाट सहन करावा लागतो. पण ऑगस्टपासून चार डब्यांच्या मोनोरेलमध्ये वातानुकूलित वातावरणात अवघ्या १९ मिनिटांत हे अंतर कापता येईल. मोनोरेलची प्रवासी क्षमता ५६० आहे. या पहिल्या टप्प्यावरील मोनोरेलची सेवा सुरू करण्यासाठी गेले काही महिने मोनोरेलच्या चाचण्या घेण्यात आल्या. मोनोरेल मार्गाचे बांधकाम, त्याची सुरक्षितता, मोनोरेलची चाचणी अशा विविध गोष्टी यामध्ये पडताळून पाहण्यात आल्या. मोनोरेलचे बांधकाम ‘एल अँड टी’कडे असून मोनोरेल चालवण्यासाठी ‘स्कोमी इंटरनॅशनल’ या मलेशियात मोनोरेल सेवा देणाऱ्या कंपनीशी करार करण्यात आला आहे.
मोनोरेलचा मार्ग हा उंचावरून जात असल्याने एखाद्यावेळी मोनोरेलमध्ये बिघाड झाला तर काय? प्रवासी तसेच लोंबकळत राहणार काय? असे प्रश्न उपस्थित होत होते. या पाश्र्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वाहतूक विभागाचे प्रमुख पी. आर. के. मूर्ती यांच्याकडे विचारणा केली असता, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण काळजी आणि व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मोनोरेलमध्ये अकस्मात काही बिघाड झाला तर तातडीने दुसरी मोनोरेल पाठवून बिघाड झालेल्या गाडीला खेचून (टोइंग) पुढच्या स्थानकात नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर बिघाड झालेल्या मोनोरेलच्या शेजारच्या मार्गावर दुसरी मोनोरेल पाठवून, आडव्या शिडीच्या साह्याने एका मोनोरेलमधून सर्व प्रवासी दुसऱ्या मोनोरेलमध्ये हलवले जातील. मोनोरेलच्या दोन स्थानकांमधील अंतर फार तर दोन-तीन मिनिटांचे आहे. त्यामुळे कधीही अशी आपत्ती ओढवली तर फार फार पाच ते सात मिनिटांत प्रवाशांच्या मदत व सुटकेसाठीची यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचेल, असे मूर्ती यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मोनोरेलचे दरवाजे बंद होत असल्याने प्रवासी त्यात सापडून अपघात होऊ नयेत याचीही काळजी घेण्यात आली आहे. मोनोरेलच्या दरवाजांना आजकालच्या अत्याधुनिक लिफ्टला असतात तसे ‘सेन्सर’ असतील. एखादा प्रवासी दरवाजाच्या जवळ आला की ते आपोआप उघडतील व त्यामुळे प्रवासी आत शिरत असताना वा बाहेर पडत असताना दरवाजा बंद होऊन अपघात होण्याचा प्रश्न येणार नाही, असेही मूर्ती यांनी स्पष्ट केले.
या शिवाय मोनोरेल मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याची खातरजमा करण्यासाठी तीन वेगवेगळय़ा पातळीवर चाचणी केली जात आहे. प्रथम या मार्गासाठी घेण्यात आलेल्या उपकरणांच्या सुरक्षिततेची चाचणी करण्यात आली. त्यानंतर आता मोनोरेल मार्गाचे बांधकाम, त्यावरील सिग्नल यंत्रणा आदींची चाचणी सुरू आहे. सर्वात शेवटी प्रवासी वाहतुकीस सुरुवात करण्यापूर्वी त्रयस्थ यंत्रणेमार्फत मोनोरेल मार्गाच्या सुरक्षिततेची चाचणी करण्यात येईल. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच प्रवासी वाहतूक सुरू होईल.