अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे सन्मानाचे पद आहे. यामध्ये कोणीही माझा प्रतिस्पर्धी नाही. कोण किती लोकप्रिय आहे त्यापेक्षा सर्वप्रिय हे मापदंड मी मानतो. संमेलनाचे अध्यक्षपद हा एक टप्पा असून साहित्याची ४० वर्षे सेवा केल्यानंतर अध्यक्षपद लाभल्यानंतर तुम्ही काय करणार, हा प्रश्नच अप्रस्तुत वाटतो, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कवी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे दावेदार फ.मुं. शिंदे यांनी व्यक्त केली.
संमेलन ही एक सामाजिक घटना असून आनंदोत्सवाचा भाग आहे. त्यामुळे साहित्य संमेलनांच्या निमित्ताने जाणिवांचे जग त्याठिकाणी समृद्ध झाले पाहिजे, असेही शिंदे यांनी सांगितले. विदर्भ साहित्य संघाच्या संकुलात फ.मुं.नी आज पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे उपस्थित होते.
समाजाशी संवाद करणे, लिहिणे पुढेही सुरूच राहील, असे सांगून शिंदे म्हणाले, संमेलनांमध्ये नव्या पिढीशी संवाद होत नाही. त्यापेक्षा तालुका, जिल्हा किंवा विभागीय पातळीवर होणाऱ्या संमेलनातून संवादाची तीव्रता जास्त जाणवते. छोटी संमेलने जेवढी उत्कट, हृदयसंवादी होतात तेवढी मोठी संमेलने होत नाहीत. त्यामुळेच तालुका पातळीपर्यंत संमेलने झाली पाहिजेत. संमेलनाला वैचारिक अधिष्ठानही असते. ती एक सामाजिक घटना असून तो एक आनंदाचा उत्सव असतो. हे जाणिवांचे जग युवावर्गाला जोडून ते अधिकाधिक समृद्ध झाले पाहिजे. नवीन पिढीच्या जगण्याशी संबंधित उपक्रम संमेलनांमध्ये असले पाहिजेत, असे फमुं म्हणाले.
संमेलनांमध्ये ठराव मांडणे आणि होयचे बहुमत म्हणून ते मान्य करणे हा विनाकरण असलेला पायंडा आहे. त्या ठरावांवर पुढे काहीच होत नाही आणि साहित्य प्रेमींच्या सहभागातून चर्चाही होत नसल्याचे फमुंनी मान्य केले. मात्र, समाजाच्या भावनांचे प्रतिनिधीत्व करण्याचे काम ठराव करतात, असे मत रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. सकस साहित्याची निर्मिती ज्या भाषेत असते ती समृद्ध असते. कुठल्याही लाटेने ती ओसरत नाही. हिंदीला समृद्ध करण्याचे काम हिंदी सिनेमांनी केले म्हणूनच आज गावागावात हिंदी पोहोचली आहे. महाराष्ट्रीय आईवडील उन्हाळ्यांच्या सुट्टय़ांमध्ये चार मराठीची पुस्तके मुलांना वाचायला सुचवू शकतात. मराठी भाषा अगदी शाळेपासून ते महाविद्यालयांपर्यंत अनिवार्य करायला हवी, असे फुटाणे म्हणाले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बोटावर मोजण्याइतपत महिलांची अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी एखादी महिला निवडून येण्यापेक्षा पुढील वर्षी महिला अध्यक्ष निवडावा, अशी विनोदी प्रतिक्रिया रामदास फुटाणे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली तर ‘प्रतिमा इंगोले यांनाच का निवडून आणले नाही’, असा सूचक प्रतिप्रश्न फमुंनी उपस्थित केला.