नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील ६१८ प्रकल्पग्रस्तांना बुधवारी साडेबावीस टक्के योजनेअंर्तगत ८० हेक्टर जमिनींचे वाटप करण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांचे नवीन वर्ष आनंदात जाणार असून १४ गावांतील स्थलांतरित होणास संमती देणाऱ्या ४०९ ग्रामस्थांनादेखील नवीन घर बांधण्यासाठी पुष्पकनगर येथे नवीन भूखंड देण्यात आले आहेत. सिडकोने बुधवारी काढलेल्या सोडतीमुळे ९५ टक्के भूखंड वाटप झाले असून आता शेवटची एक सोडत काढली जाणार आहे. यामुळे विमानतळ उभारणीतील महत्त्वाचा अडसर दूर झाला असून पुढील वर्षी या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. नवी मुंबई विमानतळाला एकूण २२६२ हेक्टर जमीन लागणार असून ६७१ हेक्टर जमीन १४ गावांखाली आहे. ही जमीन देण्यास प्रकल्पग्रस्तांनी आता तयारी दर्शवली असून सिडको पुनर्वसन पॅकेजनुसार त्यांना साडेबावीस टक्के योजनेतील भूखंड देत आहे. त्याची तिसरी सोडत बुधवारी सिडको मुख्यालयात झाली. त्यात ६१८ प्रकल्पग्रस्तांना १४० सोडतीद्वारे भूखंड जाहीर करण्यात आले आहेत. सोडतीतील ही भूखंडाची यादी यानंतर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली जाणार असून ते अ‍ॅवॉर्ड कॉपीमध्ये या भूखंडाची नोंद करणार आहेत. अ‍ॅवॉर्डमध्ये भूखंडाची नोंद ही सिडकोने केलेली पहिलीच पद्धत आहे. त्यामुळे अ‍ॅवॉर्ड ज्या दिवशी हातात पडेल त्या दिवशी प्रकल्पग्रस्ताला त्याच्या भूखंडाचा पत्ता आणि क्रमांकदेखील समजणार आहे. त्यानंतर वाटपपत्र आणि करारनामा करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील वर्ष विमानतळ प्रकल्पग्रस्तांना सुगीचे दिवस दाखविणारे ठरणार असल्याचे दिसून येते. या पुनर्वसन पॅकेजप्रमाणे ज्यांची घरे तुटणार आहेत त्यांना नवीन घरे बांधण्यास खर्चासह भूखंड दिले जात असून बुधवारी ४०९ प्रकल्पग्रस्तांना असे भूखंड देण्यात आले. त्यामुळे नवीन वर्षांत त्यांची नवीन घरे उभी राहणार आहेत. त्यासाठी २७ हेक्टरचे सेक्टर राखीव ठेवण्यात आले आहे. पाच पंचांच्या साक्षीने ही सोडत काढण्यात आली असून पारदर्शकतेचे सर्व निकष पाळण्यात आले होते.