मराठवाडा प्रदेश आईच्या काळजाचा आहे. याच मराठवाडय़ाने मला संकटाच्या काळात जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती देऊन मोलाची मदत केली. वाईटातून नेहमीच चांगले घडत असते. त्यामुळे महिलांनी घाबरण्याचे वा आत्महत्येसारखा टोकाचा विचार करण्याचे कारण नाही. त्यातूनच तुम्हाला जीवन जगण्याची वाट व दिशा सापडते, असा सल्ला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ यांनी दिला.
सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्री यात्रेनिमित्त सिंधुताईंचे ‘महिलांवरील अत्याचार, भ्रूणहत्या व उपाय’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. व्यासपीठावर आमदार दिलीपराव देशमुख, विक्रम गोजमगुंडे, सुवर्णाताई देशमुख, अनुराधा देशमुख, महापौर स्मिता खानापुरे आदी उपस्थित होत्या. सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की, विलासराव देशमुख नावाचा गरुड उडून गेला. तुमचे कफन जळाले तर जळू द्या. पण तुमचे दफन होऊ देऊ नका, ही विलासरावांची शिकवण कधीही विसरू नका. विलासराव सर्वासाठी जगले, तुम्हीही तसे जगा. मुलींनो झाकून राहायला शिका. खूप मोठे व्हावे, पण पायरीची जागा सोडू नये. मुलींना मारू नका, तर जगवा व जगायला शिकवा. पत्नी आली की मुले आई-वडिलांना विसरतात. आई व वडीलही हवेतच, याची जाणीव आजच्या मुलांनी ठेवावी. संसार हा एकटय़ाचाच नसतो, तर पती-पत्नी दोघांचाही असतो. तो नीटपणे करा. पत्नीवर अत्याचार नव्हे, प्रेम केले तर संसार सुखाचा होतो, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.