२४२ कोटी ४५ लाखांचा शिलकी अर्थसंकल्प
ठाणे जिल्ह्य़ातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका असणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेचा २४२ कोटी ४५ लाख १७ हजार ९४६ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प विशेष सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. मालमत्ता करात वाढ करण्यात आली नसली तरी करमूल्य दरात ५० टक्केवाढ करण्यात आल्याचे मुख्याधिकारी राजेश कानडे यांनी सांगितले. तसेच यंदापासूनच प्रतिघरटी ३५० रुपये मलनि:सारण कर आकारण्यात येणार आहे.
केंद्र तसेच राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान व मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शहरातील वाढत्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविणे कठीण आहे. त्यामुळे पालिकेने नवे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याची आवश्यकता उपस्थित लोकप्रतिनिधींनी या वेळी बोलताना व्यक्त केली.
त्यासाठी पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी मंडई नव्याने विकसित करणे, एस.टी. स्थानकासाठी राखीव भूखंडावरील अतिक्रमण हटवून तिथे बहुमजली इमारत बांधणे आदी योजना असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी या वेळी      दिली.
पालिकेच्या अपेक्षित उत्पन्नात मुख्यत्वे करून बीएसयूपी, भुयारी गटार, राज्य तसेच केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या विविध अनुदानांचा समावेश आहे.
विविध योजनांसाठी कोटय़वधींचे अनुदान देताना शासनाने पालिकेला उत्पन्नवाढ करण्यास सुचविले आहे, कारण अनुदानासोबतच पालिकेला या प्रकल्पांसाठी कर्जेही दिली जात असून ती फेडण्यासाठी पालिका आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीवर भर देण्याची आवश्यकता मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे यशवंत जोशी, मनसेचे संदीप लकडे, राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील आदींनी चर्चेत भाग                घेतला.