रुग्णालयातून किंवा एखाद्या घरून पार्थिव नेण्यासाठी शववाहिकेची आवश्यकता असते, पण अनेकांना ती लवकर उपलब्ध होत नाही आणि झालीच तर मनमानी शुल्क आकारून समाजातील गरिबांची लुबाडणूकच होते. विविध सामाजिक संघटनांनी समाजातील पार्थिव नेण्यासाठी शववाहिका खरेदी केल्या आहेत. ज्यांनी मागणी केली त्यांच्याकडे ती शववाहिका जात असली तरी आज काही संस्था पैसे घेतल्याशिवाय पार्थिव नेत नाहीत. समोरचा माणूस दुखात आहे हे माहित असल्यामुळे आपण म्हटले तेवढे शुल्क देण्यास ते तयार असतात. त्यामुळे शववाहिका चालविणारे चालक मनमानी शुल्क मागून लोकांची लुबाडणूक करीत असतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील शवागाराच्या बाहेर काही खासगी शववाहिका उभ्या असताना दिसून येतात. रुग्णालयातून पार्थिव घेऊन जाण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाकडून व्यवस्था नाही. त्यामुळे लोकांना खासगी शववाहिकेशिवाय पर्याय नसतो. शवविच्छेदन सुरू असताना मृताच्या कुटुंबांना शववाहिकेचे चालक भेटून त्यांच्याशी पैशाची वाटाघाटी करीत त्यांच्याकडून मनमानी शुल्क घेतात. साधारणत: १० ते १५ किलोमीटर जायचे असेल तरी १५०० ते २००० रुपये आणि जिल्ह्य़ात किंवा विदर्भात अन्य ठिकाणी पार्थिव घेऊन जायचे असेल तर २५०० ते १५ हजारांपयर्ंत शुल्क आकारले जात असल्याचे एका खासगी शववाहिकेच्या चालकाने सांगितले. शासकीय वैद्यकीय रुग्णालय परिसरात शववाहिका आणि रुग्णवाहिका मिळवून देण्यासाठी काही दलाल सक्रिय असून ते रुग्णालय परिसरात फिरून संबंधितांना भेटतात. खासगी शववाहिका आणि रुग्णवाहिकांना रुग्णालय परिसरात बंदी असताना शवागाराच्या बाहेर किंवा रुग्णालयाच्या बाहेर उभ्या केल्या जातात. मेडिकल ते धरमपेठ भागात जायचे असेल तर १५०० ते २००० रुपये आकारत असतात आणि त्यांना इतके पैसे का? असे विचारल्यावर गाडी धुण्याचे कारण सांगतात. सामाजिक संस्थातर्फे चालविणाऱ्या काही शववाहिकेचे दर ठरविले असले तरी ते देणगी म्हणून स्वीकारत असतात. साधारणत: खासगी संस्थांच्या शववाहिका ३०० ते ५०० रुपये देणगी शुल्क आकारतात. नागपुरात सनातन धर्मसभा, मातृसेवा संघ, सेवा भारती, मुस्लिम कब्रस्तान, गुरुद्वारा सिंग सभा, युनिव्हर्सल सोशल वेलफेअर सोसायटी, झुलेला मंदिर ट्रस्ट, अच्युतराम महाजन स्मृती, गुरुदास कमिटी, मैत्री परिवार यासह शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या शववाहिका असताना त्या सामाजिक कार्य म्हणून शहरातील विविध भागात जात असतात.
राम भाकरे, नागपूर