पनवेलमध्ये रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांच्या किंवा मृतांच्या नातेवाईकांकडून मनमानी पद्धतीने भाडे वसूल करण्यात येत होते. या विरोधात १७ जुलै रोजी ‘लोकसत्ता’ने अडचणीतील नातेवाईकांकडून रुग्णवाहिका चालकांची खंडणीखोरी या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. यामुळे जागे झालेल्या पनवेल उपप्रादेशिक परिवहन विभागाने रुग्णवाहिका चालकांच्या या खंडणीखोरीविरोधात दंड थोपटले असून अशा रुग्णवाहिका चालकांचा वाहन परवाना निलंबित करण्याचा इशारा पनवेलचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अरुण येवला यांनी दिला आहे. रुग्णवाहिका चालक नियमानुसार दर आकारात नसल्यास संबंधिताने परिवहन कार्यालयात तक्रार करावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.
पनवेल तालुक्यासह मुंबई मेट्रोपोलेटीन शहरांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या भाडेदर आकारण्याची अंमलबजावणी रुग्णालये व रुग्णवाहिका चालकांना बंधनकारक केले आहे. रुग्णवाहिका चालकांच्या या खंडणीखोरीपासून सुटका होण्यासाठी सरकारी भाडेदराचा हट्ट रुग्णाच्या नातेवाईकांनी धरल्यास हा पेच निकाली लागू शकतो, असा विश्वास परिवहन विभागाचे येवला यांनी व्यक्त केला आहे.
पनवेल तालुक्यात लहानमोठे ११० रुग्णालये आहेत.  यापैकी कामोठे येथील ६०० खाटांचे एमजीएम रुग्णालय हे सर्वात मोठे आहे. पनवेलमध्ये २०२ रुग्णवाहिका रस्त्यांवर धावतात. रुग्णवाहिका चालक रुग्ण किंवा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या अडचणीचा फायदा घेत कशा पद्धतीने मनमानी भाडे वसूल करून लूट करतात याचे वास्तव ‘लोकसत्ता’ने समोर आणले होते. यानंतर परिवहन विभागाने रुग्णवाहिका चालकांनी नियमानुसार भाडेदराच्या अंमलबजावणीबाबत मोहीम हाती घेतली आहे.  नियमानुसार भाडे आकारणी करावी, अशी सूचना परिवहन विभागाने रुग्णवाहिका चालकांना केली आहे. अशा दराच्या सूचनेसंबंधीच्या जनजागृतीचे प्रसिद्धी पत्रक परिवहन विभागाने जाहीर केले. या दरपत्रकाचे फलक रुग्णालयाच्या प्रवेशद्वारांवर मोठय़ा स्वरूपात झळकविण्याच्या सूचना पनवेल प्रादेशिक अधिकारी येवला यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. या दराच्या अंमलबजावणीसाठी रायगड जिल्ह्य़ाचे शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्याकडे त्या आशयाचे लेखी पत्र त्यांनी पाठविले आहे. जनजागृती करूनही रुग्णवाहिका चालकांनी मनमानी भाडेआकारणी सुरूच ठेवल्याच्या तक्रारी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात आल्यास संबंधित रुग्णवाहिका चालकाचा परवाना कायम स्वरूपी निलंबित होऊ शकतो, त्यामुळे सक्तीची कारवाई करण्यास परिवहन विभागाला भाग पाडू नये, असे अधिकारी येवला यांनी सांगितले.  

२५ किलोमीटर अंतरासाठी किंवा २ तास वापरासाठी जे कमी असेल ते तसेच प्रती किलोमीटर रुग्णवाहिकांसाठी भाडे दर खालीलप्रमाणे आहे.
सुधारित प्रस्तावित रुग्णवाहिकांचे भाडेदर
* मारुती व्हॅन –  २५ किलोमीटरसाठी किंवा सुरुवातीच्या दोन तासांकरिता ५०० रुपये. त्यापुढील किलोमीटरसाठी १० रुपये प्रती किलोमीटर दर होईल.
* टाटा सुमो किंवा मेटॅडोर सदृश्य कंपनीने बांधणी केलेल्या रुग्णवाहिकांसाठी – पहिल्या २५ किलोमीटरकरिता किंवा सुरुवातीच्या दोन तासांसाठी ६०० रुपये भाडे. त्यानंतर पुढील २५ किलोमीटरसाठी १० रुपये प्रती किलोमीटर भाडे असेल.
* टाटा ४०७ स्वराज माझदा आदींच्या साटय़ावर बांधणी केलेल्या रुग्णवाहिकेंसाठी – पहिल्या २५ किलोमीटर अथवा सुरुवातीच्या दोन तासांसाठी ७०० रुपये भाडे आकारावे. तसेच २५ किलोमीटरपेक्षा अधिकच्या किलोमीटरसाठी १४ रुपये भाडे आकारावे.
* आय.सी.यू. अथवा वातानुकूलित – सुरुवातीच्या २५ किलोमीटर किंवा दोन तासांसाठी ८५० रुपये आणि २५ किलोमीटरच्या पुढील अंतरासाठी १७ रुपये प्रती किलोमीटर भाडे घ्यावे.   

लॉगबुक पद्धत सक्तीची करावी
रुग्णवाहिका चालकांच्या खंडणीखोरीतून सामान्यांची सुटका होण्यासाठी मुंबई येथील कुर्ला येथे राहणारे विनोद साडविलकर यांनी परिवहन सचिवांकडे लेखी तक्रार केली आहे. साडविलकर यांच्या मते रुग्णवाहिका चालकांनी लॉगबुक पद्धत अवलंबल्यास ही खंडणीखोरी थांबू शकते. आजमितीला कोणतीही पावती रुग्णवाहिका चालक रुग्णांच्या नातेवाईकांना देत नाहीत. मात्र लॉगबुकमुळे रुग्णवाहिका किती अंतर कापते, हे अंतर कापण्यासाठी वेळ किती गेला, त्यामुळे भाडे आकारणीविषयी स्पष्टता सामान्यांना होईल तसेच त्या लॉगबुकची दुय्यमप्रतही बिल रूपाने रुग्णाचे नातेवाईक वापरू शकतात.

सुधारित अटी व शर्ती
*  हे भाडेदर महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणातील क्षेत्रासाठी असून हे भाडेदर रुग्ण रुग्णवाहिकेमध्ये असल्यापासून संबंधित हॉस्पिटल पोहचण्याच्या ते परतीच्या अंतरासाठी आहे.
* २५ किलोमीटरच्या पुढे अंतर गेल्यास प्रती किलोमीटर भाडे त्या मुळे भाडय़ात वाढवून एकूण भाडे ठरेल.
* सदरचे हे भाडेपत्रक रुग्णवाहिकांच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे चालक व मालक यांना बंधनकारक करण्यात यावे.
* पहिल्या एक तासांच्या प्रतीक्षा कालावधीसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.
* पहिल्या तासानंतर प्रत्येक तासाला ५० रुपये प्रती तास भाडे लागेल.
* रुग्ण बसल्यापासून हॉस्पिटलपर्यंतच्या पल्याचे परतीचे भाडे आकारण्याची सवलत यामध्ये रुग्णवाहिका चालक-मालकांना देण्यात आली आहे.
(उदा. कळंबोली ते एमजीएम कामोठे हे ३ किलोमीटर अंतर आहे. या पल्ल्यासाठी ६ किलोमीटरचे ५०० रुपये भाडे रुग्णांच्या नातेवाईकांना देणे गरजेचे आहे.)