भूतनाथ रिटर्न चित्रपटासाठी अमिताभ बच्चन दोन दिवसांपासून पनवेलमधील आयुश रेस्टॉरंटमध्ये चित्रीकरणासाठी आला आहे. ८ कोटी रुपये खर्च करून चित्रपटाच्या निर्मात्याने रेस्टॉरंटमध्ये उभारलेला महाल हे या सेटचे मुख्य आकर्षण आहे. बुधवारी रात्री या महालात भूत बनून प्रसिद्ध गायक हनी सिंग हासुद्धा पन्नास लहाग्यांच्या समूहात फिरतानाचे नृत्यचित्रीकरण करण्यात आले. या चित्रपटात पुण्याचा वंडरबॉय पार्थ भालेराव हा अमिताभसोबत काम करत आहे.
लहान मुलांच्या मनावर अमिताभने भूतनाथ चित्रपटाद्वारे या अगोदरच ठसा उमटवला आहे. या चित्रपटाचा रिमेक म्हणून निर्मात्यांनी भूतनाथ रिटर्न चित्रपट आणला आहे. ८० कोटी रुपयांच्या बजेटचा हा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. आजच्या परिस्थितीमुळे लहानग्या मुलांच्या मनात उद्भवणारे प्रश्न या चित्रपटात गृहीत धरून हा चित्रपट बनविण्यात आला आहे. भूतनाथने पृथ्वीवर चांगले काम करण्यासाठी लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे या हट्टापायी भूतनाथ र्टिनमध्ये चक्क तो निवडणूक रिंगणात उतरलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे घडणाऱ्या घडामोडींचा धांडोळा या चित्रपटात घेतल्याचे समझते.
बुधवारी रात्री विश्रांती घेत असलेल्या अमिताभने व्हॅनमध्ये अधिक वेळ काढल्याने अमिताभला काही झाले का, अशीच चर्चा सर्वत्र होती. मात्र रात्री दहा वाजता अमिताभ व्हॅनबाहेर पडला आणि त्यांनी सेटवर इतरांच्या तब्येतीची चौकशी केल्यानंतर सर्वाच्या जिवात जीव आला. दोन दिवसांपासून पनवेलमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करणारा अमिताभ शूटिंगनंतर खंडाळा येथील त्याच्या बंगल्यावर जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.