परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी राज्यातील सर्व परिवहन कार्यालये ‘दलाल’मुक्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नागपुरातील परिवहन दलालांनी आज आंदोलनाचा पवित्रा घेतला. शिवसेनेचे दिवाकर रावते मंत्री असलेल्या या विभागाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघर्षांचा झेंडा हाती घेत आज शहरातील परिवहनदलालांना घेऊन संविधान चौकात निदर्शने केली.
परिवहन कार्यालयाच्या परिसरात कोणीही दलाल दिसू नये अशी सक्त ताकीद झगडे यांनी दिल्याने परिवहन कार्यालयाला कोणतेही सहकार्य न करण्याचा निर्णय परिवहन दलालांनी घेतला आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या नेतृत्वाखाली या दलालांच्या विविध संघटनांनी संविधान चौकात निदर्शने करीत झगडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या १९९९ साली झालेल्या निकालात वाहनधारक किंवा परवानाधारक आपला प्रतिनिधी ठेवून आपले काम करवून घेऊ शकतो. आयुक्तांनी प्रतिनिधींवर बंदी आणली असेल तर परिवहन कार्यालयात शासकीय अधिकारी व शासकीय कर्मचारी यांच्या हाताखाली असलेल्या अशासकीय व्यक्तींवर देखील त्यांनी कारवाई करावी. सीमा तपासणी नाक्यांवरील मोटर वाहन निरीक्षकांच्या हाताखाली गुंड काम करीत असून वाहन धारकांकडून अवैधपणे वसुली करीत आहेत. अशा सर्वावर झगडे यांनी कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. ऑनलाईन परवाना पध्दत रद्द करण्यात यावी यांसह विविध मागण्या परिवहन दलालांनी केल्या आहेत. मनसेसह अनेक संघटनांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारून परिवहन आयुक्ताच्या विरोधात संघर्षांचा मार्ग स्वीकारला आहे. बेकायदेशीररीत्या परिवहन कार्यालय परिसरात दलाल म्हणून काम करणाऱ्यांनी आजच्या आंदोलनात सहभागी होत, झगडे यांच्या निर्णयाला आव्हान दिले. २६ जानेवारीपर्यंत कोणतेही काम न करण्याचा निर्णय परिवहन दलालांनी घेतला असल्याचे समजते. दरम्यान, एरवी गजबजलेल्या असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात आज सामसूम होती. परिवहन दलालांनी असहकार पुकारल्याने व प्रशासनाने देखील कडक पावले उचलल्याने परिवहन कार्यालयाच्या परिसरात तुरळक दलाल होते. नागरिकांच्या सुविधेसाठी परिवहन कार्यालयाने आता मुख्य लिपिकांसह सात जणांना नियुक्त केले असून कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना माहिती देणे किंवा त्यांचे अर्ज भरून देण्यास मदत करणे इत्यादी कामे हे लिपिक करणार आहेत. अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर तसेच कार्यालय परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली असून त्याकरिता पोलीस दलाची मदत घेण्यात येत आहे. ‘दलालांनी आता कार्यालयाच्या बाहेर लोकांना अडवून कार्यालय बंद असल्याची खोटी माहिती देणे सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी माहिती अधिकारांतर्गत १२२ अर्ज या प्रतिनिधींनी टाकले असून आजही सुमारे ३०० ते ४०० अर्ज आले आहेत. या परिवहन दलालांची संख्या ५०० च्या आसपास आहे. कार्यालय परिसरात प्रवेश नियंत्रित करण्यात आला आहे. कोणताही दलाल दिवसभरात एकच काम करू शकेल व त्यापेक्षा जास्त कामे आणल्यास ते काम केले जाणार नाही, असे अतिरक्त प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.