अशासकीय अनुदानित संस्थांतील पूर्णवेळ व तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीने मंगळवारी जुन्या मुंबई-आग्रा रस्त्यावरील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष प्रा. गणेश टर्ले, प्रा. जी. पी. चित्रे, प्रा. जयंत भाभे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अनेक प्राध्यापक सहभागी झाले होते. नाशिक विभागांतर्गत उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांना शिकविणाऱ्या पूर्णवेळ आणि तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. २०१३-१४ वर्षांत कार्यभार पूर्ण केलेल्या पायाभूत अभ्यासक्रम, पर्यावरण शिक्षण व शारीरिक शिक्षण या विषयांच्या शिक्षकांच्या मान्यता व मेहनताना तात्काळ देण्यात यावा, चालू शैक्षणिक वर्षांसाठी पायाभूत अभ्यासक्रमासाठी एम. कॉम., बी.एड्. ही शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या शिक्षकांच्या नेमणुका विद्यार्थी हिताच्या दृष्टीने संस्थांनी तात्काळ कराव्यात, पर्यावरण व शारीरिक शिक्षण या विषयांच्या तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या नेमणुका करण्याचे आदेश संस्थांना तात्काळ देण्यात यावे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीचे लाभ देऊन, ग्रेड पेमधील अन्याय दूर करावा, आदिवासी भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा, विविध संस्थांतील शिक्षकीय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत संस्थांना आदेश द्यावे, पूर्णवेळ शिक्षकांना सुधारित वेतनश्रेणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांप्रमाणे १ जानेवारी १९९६ पासून मिळावी आदी मागण्या संघटनेने निवेदनाद्वारे केल्या आहेत. तसेच विद्यार्थी हिताच्या दृष्टीने ‘रिक्रूटमेंट रूल’मध्ये बदल करून विविध पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतांमध्ये १० वी व्होकेशनल या अर्हतेचा समावेश करावा, तोपर्यंत नवीन पुनर्रचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.