पूरग्रस्तांना न्याय मिळाला नाही तर आंदोलन उभारू, वेळ पडल्यास पक्षत्याग करण्याची भूमिका घेऊ, अशी तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री शिवाजीराव मोघे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे रामजी आडे यांनी आर्णी येथे धुमाजी नाईक मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केली.
पूरग्रस्त शेतकरी व नागरिक यांच्या समस्या संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. शासन व प्रशासन पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी उदासीन असल्याचा आरोप अनेक कार्यकर्त्यांनी या सभेतून केला, तसेच शेतकऱ्यांच्या शेतीचे जे सव्‍‌र्हे करण्यात आले ते शंकास्पद असून त्यातून शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता अनेकांनी याप्रसंगी व्यक्त केली. जटील अट लागू करून शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया आडे यांनी व्यक्त केली. प्रथम लोकशाही पद्धतीने प्रश्नाला वाचा फुटली नाही, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारू, असाही सूर सभेत उमटला. शेतकऱ्यांना सरसकट २५ हजार रुपये प्रती हेक्टर, तर खरडीवाल्यांना ६० हजार रुपये हेक्टर मोबदला त्वरित देण्यात यावा, अशी मागणी सभेतून करण्यात आली. शासन २००२ पासून शेतकऱ्यांवर अन्याय करत असून अद्याप खरडीची थकित रक्कम घोषणा करूनही शासनाने ११ वर्षांपासून दिलेली नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी हा अन्याय कुठपर्यंत सहन करायचा, असा सवाल त्यांनी सभेत केला.
सभेत शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत व आर्णीच्या पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, या संदर्भातही चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद, पंचायत समितीचा एकही पदाधिकारी सभेत नसला तरी तालुक्यातून सुमारे २०० कार्यकर्ते सभेला हजर होते. सभेचे मुख्य आयोजक रामजी आडे होते. त्यांनी थेट शासनाविरुद्ध भूमिका घेतल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. १९९२ पासून पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळलेला आहे. या प्रश्नाची सुरुवात आणि पाठपुरावा रामजी आडे यांनीच केला होता. मात्र, त्यांनाही यात यश मिळाले नव्हते. आता त्यांनी पूरग्रस्तांची व्यथा शासनदरबारी मांडण्यासाठी पुढाकार घेत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसला असून त्याचे कंबरडेच मोडले आहे. आता त्याला आधार देण्याची आवश्यकता आहे. खरीप हंगाम बुडाले असल्याने रब्बी पिकांसाठी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या हाती काही लागेल, अशी परिस्थिती दिसत नाही. सभेला बाजार समितीचे सभापती जीवन जाधव, पंडित बुटले, प्रकाश पाटील देशमुख, सुरेश तिवारी, श्रीराम चव्हाण, रामराव पाटील, प्रल्हाद पाटील, प्रकाश अंदुरे, सुनील भगत, अनिल नाईक, राजाराम घाटे, दाऊद भाई, निजाम बेग, शे. युनूस, विलास देशमुख आदी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन बिबीचंद जाधव यांनी केले.