‘‘अण्णांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन थंडावले नसून अण्णा पुन्हा सर्वासमोर येतील आणि त्यावेळी सामान्य माणसाचा त्यांना अधिक प्रतिसाद मिळेल,’’ असे वक्तव्य टीम अण्णाचे सदस्य आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संतोष हेगडे यांनी बुधवारी केले.
बालाजी विधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानावेळी हेगडे बोलत होते. बालाजी विधी महाविद्यालयाच्या वतीने ‘सामाजिक मूल्यांचे महत्त्व’ या विषयावर हेगडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हेगडे म्हणाले, ‘‘अण्णांच्या आंदोलनाला लोकांचा अजूनही मोठा प्रतिसाद आहे. मुंबईतील उपोषणाला कमी प्रतिसाद दिसून आला कारण अण्णांना पाठिंबा देणारा माणूस हा सामान्य आहे आणि त्याला आपले कुटुंब चालवण्यासाठी नोकरी करावी लागते. मात्र, अजूनही हा सामान्य माणूस अण्णांच्या आंदोलनाशी जोडला गेला आहे.’’ अण्णा कधीही राजकारणात प्रवेश करणार नाहीत असे स्पष्ट करतानाच हेगडे म्हणाले, ‘‘राजकारणात चांगले लोक नाहीत म्हणून लोकपालसारखे विधेयक मंजूर होत नाही. त्यामुळे चांगल्या लोकांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे, या अरविंद केजरीवाल यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. मात्र, मी राजकारण फार जवळून पाहिले आहे, त्यामुळे मी राजकारणापासून लांब राहणे पसंत केले आहे.’’  सामाजिक मूल्यांचे महत्त्व विषद करताना हेगडे म्हणाले, ‘‘सामाजिक मूल्येच समाजाला तारू शकतात. मात्र, स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सामाजिक मूल्यांची सातत्याने घसरणच झाली. संसदेमध्ये होणाऱ्या चर्चामधूनही ही गोष्ट सातत्याने समोर येते. संसदेच्या गेल्या दोन्ही सत्रांमध्ये काम होऊ शकले नाही, तरीही खासदारांना त्यांचे मानधन मिळते आहे. संसदेच्या कामकाजामध्ये व्यत्यय आणणाऱ्या खासदारांच्या मानधनामध्ये कपात करण्याचे अधिकार सभापतींना असायला हवेत.’’
वर्मा कमिटीच्या अहवालाचे कौतुक
न्यायमूर्ती वर्मा यांनी दिलेल्या अहवालाचे हेगडे यांनी कौतुक केले. हेगडे म्हणाले, ‘‘वर्मा यांच्या समितीने दिलेल्या अहवालातील सर्व सूचना अत्यंत योग्य आणि काळाशी समर्पक आहेत. मात्र, गुन्हेगाराला प्रत्येक घटनेमध्ये वयाचा फायदा देणे योग्य ठरणार नाही. गुन्ह्य़ाचे स्वरूप पाहून आणि वस्तुस्थितीचा अभ्यास करून याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. गुन्हेगाराला आपण काय करत आहोत याची जाण असेल, परिणामांची जाणीव असेल आणि तरीही त्याने गुन्हा केला असेल, तर त्याला फक्त कमी वयाचा फायदा न देता कायद्यानुसार शिक्षा होणे आवश्यक आहे.