उपनगर येथील विरोधानंतर लुटुपुटूची लढाई खेळून सुस्तावलेला महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग बुधवारी पुन्हा एकदा सक्रीय झाला. पश्चिम विभागातंर्गत इंदिरानगर, विनयनगर, वडाळा चौक ते भाभानगरच्या मागील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. मोहिमेला होणारा विरोध लक्षात घेत मोठा फौजफाटा घेऊन सुरू झालेल्या या कार्यवाहीदरम्यान नागरिकांची या पथकासमवेत शाब्दीक खडाजंगी सुरू राहिली. पालिका अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा काहींनी प्रयत्न केला. या मोहिमेत माजी उपमहापौरांच्या संपर्क कार्यालयाला पथकाने अभय दिल्याचा आरोप केला जात आहे.
अतिक्रमण निर्मूलन विभागाने गेल्या महिन्यात इंदिरानगर व साईनाथनगर परिसरासह शहरातील सर्व भागात अनधिकृत बांधकामांवर लाल रंगाचे निशाण केले होते. अतिक्रमण तोडण्याची कारवाई खरोखर होईल काय, याबद्दल साशंकता असल्याने अनेकांनी आपले अतिक्रमण ‘जैसे थे’ ठेवले होते. तर ऐनवेळी धावपळ नको म्हणून काहींनी स्वयंस्फुर्तीने आपले अतिक्रमण काढून घेतले होते. मागील महिनाभरात पालिकेने शहरातील जवळपास ३० टक्के अतिक्रमण हटविले आहे. अद्याप ७० टक्के अतिक्रमण काढण्याचे काम बाकी आहे. ही मोहीम थंडावल्याची ओरड होऊ लागली असताना बुधवारी पुन्हा एकदा तिला सुरुवात करण्यात आली. सकाळी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक इंदिरानगर येथील बापू बंगला चौकात थडकले. जेसीबी, मालमोटारीसह मोठा पोलीस फौजफाटा त्यांच्या दिमतीला होता. पथकाला पाहिल्यानंतर काही व्यावसायिकांनी स्वयंस्फुर्तीने दुकानाबाहेर लावलेले पत्रे, अनधिकृत फलकव तत्सम सामान काढून घेतले. यावेळी अतिक्रमित ओटय़ांसह हॉटेल, दुकाने यावर उभारलेल्या कमानी हटविण्यात आल्या. डीजीपीनगर येथे माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी यांचे संपर्क कार्यालय आहे. हे कार्यालय अनधिकृत असूनही पथकाने त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप स्थानिकांनी केला. पथकाने मार्गावरील अन्य अतिक्रमणे हटविली. पण या कार्यालयाचे अतिक्रमण काढले नाही.
वडाळा नाका चौफुलीपासून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला विरोध होण्यास सुरूवात झाली. वडाळा नाका चौफुलीलगत भारतनगर परिसरात मोठी झोपडपट्टी आहे. या ठिकाणी १००-१५० कच्ची घरे आहेत. या परिसरातील काही घरांवर आधीच निशाणी करण्यात आली होती. घरे खाली करण्याची सुचनाही देण्यात आली होती. मात्र नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले. पथक धडकल्यानंतर नागरिकांना काही मुदत देण्यात यावी, अशी विनंती करण्याचा प्रयत्न केला. मात्र पथक कारवाईवर ठाम असल्याने शाब्दीक वादावादीला सुरूवात झाली. विभागीय अधिकाऱ्यांपासून पथकातील कर्मचारी, बंदोबस्तावरील पोलीस यांच्याशी वाद घालण्यात आले. यावेळी पालिका अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ करण्यापर्यंत काहींनी मजल गाठली. काही नागरिकांनी मात्र पथकाला सहकार्य करत सामान घराबाहेर काढले.