शेतीच्या पाण्यासाठी रास्ता रोको

तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यात कृषिमंत्री राधाकृष्ण विखे अपयशी ठरल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे शेखर बोऱ्हाडे यांनी केली.
गोदावरी व प्रवरा कालव्यांमधून तातडीने शेतीसाठी आवर्तन सोडावे या मागणीसाठी शिवसेना, मनसे, भाजप, आरपीआय, शेतकरी संघटना यांच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बोऱ्हाडे बोलत होते. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल शेळके, राजेंद्र पठारे, नितीन कापसे, दिलीप वाघमारे, राजेश कुटे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
बोऱ्हाडे यांनी पाणीप्रश्नावरून मंत्री विखेंवर टिकेची झोड उठविली. भंडारदरा व गोदावरीचे पाणी मराठवाडय़ाला पुन्हा सोडल्यास आपण राजीनामा देऊन शेतकऱ्यांच्या बाजूने राहू, असे वक्तव्य विखे यांनी केले होते, याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. मंत्रिपद सोडणे बाजूलाच, पण त्या बैठकीत ते मूग गिळून गप्प का बसले, असा सवाल बोऱ्हाडे यांनी केला. लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांचा बुद्धीभेद करून मतदारसंघातील उभी पिके पाण्यावाचून जळून चालली असताना आवर्तनाबाबत नियोजन करण्यात अपयशी ठरले.