‘व्हॅलेंटाईन डे’ आला की, ग्रीटिंग कार्ड्स, भेटवस्तूंनी बाजारपेठ भरून जाते. पण यंदा ‘व्हॅलेंटाइन डे’वर  ‘ऑनलाइन बाजारपेठे’ने जोरदार मुसंडी मारली आहे. अँड्रॉइड, ब्लॅकबेरी, आयफोन आणि विंडोज ८ या सर्वच ऑपरेटिंग सिस्टिम्सवर आधारित व्हॅलेंटाइन अॅप्सनी गुगल प्ले, िवडोज स्टोअर्स भरून गेली आहेत. केवळ एवढेच नव्हे या अॅप्सना चांगले डाउनलोड्सही मिळू लागले आहेत.
यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अॅप्सचा समावेश आहे. सध्या तरी अँड्रॉइड आणि विंडोज अॅप्सनी यामध्ये बाजी मारलेली दिसते. सॅमसंग आणि नोकियानेही त्यांच्या अॅप्स स्टोअरमध्ये व्हॅलेंटाइन अॅप्सचा भरणा केला आहे.  
झोवी या प्रसिद्ध कंपनीने व्हॅलेंटाइन डेसाठी कपडे किंवा परफ्युम्स यांची खास निवड करणे सोपे जावे, या उद्देशाने आपले अॅप्स बाजारात आणले आहेत तर ‘आस्क मी’ने व्हॅलेंटाइन डे संदर्भातील कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारा त्याचे उत्तर आम्ही नक्कीच देऊ असा दावा करत त्यांची अॅप्स बाजारात आणली आहेत. ‘व्हॅलेंटाइन डे’साठी प्रियेला किंवा प्रियकराला चॉकलेटस् अथवा फुले द्यायची आहेत तर त्यासाठी शोधाशोध कुठे करणार, याची माहिती तुम्हाला या अॅप्लिकेशनवर मिळेल.
अलीकडे जवळपास सर्वच स्मार्टफोन्समध्ये जीपीएसची सोय असते. त्यामुळे तुम्ही नेमके कुठे आहात, याचा शोध सोपा होतो. तुम्ही फोन सुरू करता, त्या वेळेस तुम्ही कोणत्या स्थळी आहात, त्याची नोंद अॅप्सतर्फे घेतली जाते आणि मग त्यांच्या डेटाबेसमधील जवळच्या चॉकलेट किंवा फुलांच्या दुकानाचे पत्ते तुम्हाला मोबाइलवर दिसू लागतात. काही दुकानांनी तर तुम्हाला तिथे नेमके काय काय उपलब्ध आहे, त्याची माहितीही या अॅप्सद्वारे देण्याची सोय केली आहे.
व्हॅलेंटाइन्स डे आणि प्रेमाशी संबंधित गाणी यांचे तर जवळचे नाते आहे. धिंगाणा, हंगामा, रागा, गाना आणि लाइव्ह एचडी या संकेतस्थळांनी त्यांच्या प्रेमविषयक गाण्यांसाठी एक अॅप्लिकेशन विकसित केले आहे. त्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियेला किंवा प्रियकराला एखादे गाणे भेटीदाखल पाठवू शकता.. या अॅप्सलाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. म्हणूनच यंदाचा व्हॅलेंटाइन डे ‘अॅप्स’मय झाला आहे.