गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील छप्पन्नावा लेख.
शहरांप्रमाणेच गावांच्या विद्रूपीकरणाला निवडणूक, वाढदिवस व तत्सम कार्यक्रमांचे जाहिरात फलक अर्थात होर्डिग्ज हातभार लावत असतात. फलकबाजीवरून गटा-तटांमध्ये वादाचेही प्रसंग उद्भवतात. अनधिकृतपणे उभारल्या जाणाऱ्या जाहिरात फलकांना चाप लावण्याचा प्रयत्न महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत करता येतो.
नाशिकसह धुळे, जळगाव व नंदुरबार या शहरांसह ग्रामीण भागातही स्वस्तात प्रसिद्धीचे माध्यम म्हणून होर्डिग्जचे पेव फुटले आहे. गावातील मोक्याची ठिकाणे, प्रमुख रस्ते, प्रवेशद्वार व अंतर्गत रस्ते अशा जागा आपली जहागिरी असल्याच्या थाटात होर्डिग्जसाठी काबीज केल्या जातात. ठिकठिकाणी लागलेल्या फलकांनी गावांना बकाल स्वरूप प्राप्त करून दिले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील अनधिकृत होर्डिग्ज काढण्याचे निर्देश दिले होते. तसेच होर्डिग्जवर ज्या नेत्यांच्या छबी झळकत आहेत, त्यांनाही नोटिसा पाठविण्याचे सूचित केले आहे. या निर्णयाचा आधार घेऊन ग्रामपंचायत अनधिकृत होर्डिग्ज विरोधात धडक मोहीम राबवू शकते. गावात अनधिकृतपणे होर्डिग्ज लागणार नाहीत, याची तंटामुक्त गाव समितीने दक्षता घेतल्यास गावाचे विद्रूपीकरण टाळता येईल. ग्रामपंचायतीच्या मदतीने गावात जाहिरात फलकासाठी काही विशिष्ट जागा निश्चित करता येतील. या जागांवर फलक उभारण्याची परवानगी देण्यासाठी खास नियमावली तयार करता येईल. जेणेकरून नियमानुसार असे होर्डिग्ज केवळ निश्चित केलेल्या जागांवर उभारले जातील. या माध्यमातून ग्रामपंचायतीस उत्पन्नाचाही नवा स्रोत निर्माण करता येऊ शकतो. एकदा जागा निश्चिती व नियमावली तयार झाली की, त्या व्यतिरिक्त इतरत्र अनधिकृत होर्डिग्ज लागल्यास ते काढण्याची कारवाई ग्रामपंचायत करू शकते. सद्य:स्थितीत होर्डिग्ज हटविताना ते कोणी लावले आहे, याचाही विचार केला जातो. मातब्बर नेत्यांच्या छायाचित्रांचा समावेश असणारी होर्डिग्ज अपवादाने हटविली जातात, असा अनुभव आहे.
परंतु कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तंटामुक्त गाव समिती व ग्रामपंचायतीने असे फलक हटविण्यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. या स्वरूपाचे फलक लावण्यासाठी नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी करणे महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेत अभिप्रेत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. या दृष्टीने काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना खास गुणही दिले जातात.