नवीन वीज मीटर जोडणीसाठी ठेकेदाराकडून एक लाखांची लाच घेताना निगडी प्राधिकरण येथील महावितरण विभागाच्या उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंत्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
उपकार्यकारी अभियंता संदीप दत्तात्रय दरवडे (वय ३४, श्रद्धा रेसिडेन्सी, आळंदी रस्ता, भोसरी), कुनाल नंदकुमार पेन्सलवार (वय २८, रा. एसएसईबी कॉलनी, अशोकनगर) आणि हिरामन रामचंद्र कदम (वय ४८, रा. रुपीनगर, तळवडे, निगडी) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी विद्युत ठेकेदार सुनील शरद ब्रम्हे (वय ४९, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रम्हे हे विद्युत ठेकेदार म्हणून काम करतात. त्यांचे आकुर्डी येथे ओम रिएलेटर्स व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण या ठिकाणी नवीन ७३ वीज जोडणी बसवून देण्याचे काम सुरू आहे. या कामाचा प्रस्ताव घेऊन ते महावितरण कंपनीच्या निगडी प्राधिकरण येथील कार्यालयातील दरवडे यांच्याकडे गेले. हा प्रस्ताव पाहून दरवडे यांनी त्यांच्याकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. ब्रrो यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
ब्रम्हे यांना पंचांसह दरवडे यांच्या कार्यालयात पाठविण्यात आले. त्यावेळी त्यांनी ब्रम्हे यांचा ७३ वीज मीटर बसविण्याचा प्रस्ताव स्वीकारला. त्यांना कनिष्ठ अभियंता पेन्सलवार यांना भेटण्यास सांगितले. ५ फेब्रुवारीला ब्रम्हे हे दरवडे यांना भेटले असता त्यांच्यात बोलणी होऊन तडजोडअंती दोन लाख रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी एक लाख रुपये मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास देण्याचे ठरले. त्यानुसार लाचलुचपत विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, पोलीस निरीक्षक प्रकाश शिंदे यांनी निगडी प्राधिकरण महावितरणच्या कार्यालयात सापळा लावला. त्यानुसार दरवडे यांच्या सांगण्यावरून पेन्सलवार यांनी कदम यांना लाच घेण्यास सांगितली. त्यानुसार लाच घेताना कदम यास रंगेहात पकडले.