विकास योजनांमधून सहज मिळू शकणाऱ्या कोटय़वधी रुपयांचा लाभ आणि लोभ टाळून कल्याणमधील आग्रा रोडवरील वडिलोपार्जित वास्तू कसोशीने जपणारे चित्रकार श्रीधर केळकर यांनी सध्या त्यांच्या घरासमोरील अंगणातच त्यांच्या काही निवडक चित्रकृतींचे प्रदर्शन भरविले आहे.
जे.जे. कला महाविद्यालयातून जी.डी. आर्टचे प्रशिक्षण घेतलेल्या श्रीधर केळकरांच्या चित्रकला साधनेचे यंदा ५० वे वर्ष आहे. त्यांच्या आजोबांनी १९१५ मध्ये घेतलेल्या घरातच त्यांचा जन्म झाला. त्यांच्या या वडिलोपार्जित घराचे यंदा ९९ वे वर्ष आहे. यानिमित्ताने रसिकांच्या आग्रहाखातर याच घरासमोरील अंगणात त्यांनी त्यांच्या निवडक चित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनात केळकरांनी रेखाटलेली जलरंग, तैलरंगातील चित्रे तसेच रेखाचित्रे मांडण्यात आली आहेत. बालवर्गात असणाऱ्या केळकरांच्या नातीने-अवनीने या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. आजोबांना वेडावून दाखवीत असतानाचे तिचे लोभसवाणे व्यक्तिचित्रही या प्रदर्शनात आहे. ज्या अंगणात माझी मुंज झाली, तिथेच माझ्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यातला आनंद अवर्णनीय आहे, अशी प्रतिक्रिया केळकर यांनी वृत्तान्तशी बोलताना व्यक्त केली. रविवार २७ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत हे प्रदर्शन सर्व रसिकांसाठी खुले आहे.