वयोवृद्ध कलावंतांच्या मानधनात महागाईनुसार वाढ करावी, जिल्हास्तरीय वृद्ध कलावंत आणि साहित्यिक निवड समितीवर महासंघाच्या प्रतिनिधींची तत्काळ नियुक्ती करावी, तरुण कलावंतांना रोजगारास्तव वाद्यांचे वाटप करावे आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी येथील जिल्हा परिषदेसमोर भारतीय कलावंत महासंघाच्या वतीने गायक सोमनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ‘ढोलनाद आंदोलन’ करण्यात आले.
कलावंतांच्या अनेक मागण्या सरकार दरबारी पडून आहेत. त्यामध्ये कलावंतांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यासाठी राष्ट्रमाता फाऊंडेशनला विश्वासात घ्यावे, जिल्ह्य़ातील कलावंतांना राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्रमांक दोनच्या धर्तीवर लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावे घरकुल बांधून द्यावीत, युवक कलावंतांना आर्थिक सहाय्य म्हणून पाच लाख रूपये बिनव्याजी कर्ज मंजूर करावे, कलावंतांना एसटी व रेल्वे प्रवासात ७५ टक्के सवलत द्यावी, कलावंतांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाचे काम त्वरीत सुरू करावे, रात्री १० नंतर लोककलाकारांना वाद्य वाजविण्यास असलेली बंदी उठविण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर राष्ट्रमाता सोशल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आशाताई जाधव, प्रा. शरद शेजवळ, गोकुळ लोखंडे, पुष्पेंद्र जाधव आदींची स्वाक्षरी आहे.