नाटय़ाचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदतर्फे १४ जून रोजी आयोजित कलावंत मेळाव्यात ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकातील कलाकारांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. नुकतीच या नाटकाला ५० वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने आयोजित या सत्कार कार्यक्रमातून पुन्हा एकदा नाटकाचे स्मरणरंजन केले जाणार आहे.
वसंत कानेटकर लिखित आणि मा. दत्ताराम दिग्दर्शित या नाटकाचा पहिला प्रयोग १ मे १९६४ रोजी मुंबईत बिर्ला मातोश्री सभागृहात सादर झाला होता. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी या नाटकाला संगीत दिले होते. नाटकातील सर्व गाणी खूप गाजली इतकेच नव्हे तर आज पन्नास वर्षांनंतरही ती रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. ‘धि गोवा हिंदूू असोसिएशन’ने हे नाटक सादर केले होते. संस्थेने नाटकाचे ५०० प्रयोग केले.  
मूळ नाटकात भूमिका करणारे मा. दत्ताराम, श्रीपादराव नेवरेकर आणि परशुराम सामंत आता हयात नाहीत. पण नाटकाच्या पहिल्या प्रयोगापासून त्यात काम करणारे ज्येष्ठ गायक रामदास कामत, ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर, भारती मंगेशकर आणि ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर हे चार कलाकार हयात आहेत. विशेष सत्कार कार्यक्रमात या सगळ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच या नाटकातील अन्य कलाकार अभिनेत्री शोभा आर्य, ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज, इंदूमती पैंगणकर ऊर्फ कानन कौशल, ललिता केंकरे यांनाही गौरविण्यात येणार आहे. १४ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा येथे सांगली येथील संस्थेने सादर केलेला ‘संगीत मत्स्यगंधा’ नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.