अरूणाचल राज्यातील काही अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज नगर शहराला भेट दिली. निवडक नगरकरांशीही त्यांनी चर्चा केली. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने त्यांची ही भेट आयोजित करण्यात आली होती.
ऐतिहासिक भुईकोट किल्ला, चाँदबीबी महाल, रणगाडा संग्रहालय, फऱ्याबाग अशा काही स्थळांना या पथकाने भेट दिली. पंडित नेहरू यांच्यासह देशातील त्यावेळचे बीनीचे नेते काराबद्ध असलेल्या किल्ल्यातील कक्षालाही त्यांनी भेट दिली. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ नेहरूंनी याच तुरूंगात लिहिला असल्याचे ऐकून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. किल्ल्यातील झुलत्या पुलानेही ते चकित झाले.
पथकातील एक सदस्य सुरज तायंग यांनी किल्ल्याचे काम रेंगाळले असल्याबद्धल खंत व्यक्त केली. तसेच झुलत्या पुलाच्या दुरावस्थेबाबतही त्यांनी विचारणा केली. महाराष्ट्रात चांगली कामे होत आहेत, मात्र आमच्या राज्याच्या प्रगतीबबाबत असमाधानी आहोत असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. स्वातंत्र्याला ६६ वर्षे झाली तरीही आम्ही अजून अविकसीतच आहोत असे ते म्हणाले. दुसरे एक सदस्य बी. बून यांनी दुर्गम पहाडी प्रदेशामुळे विकासकामांना अडसर निर्माण होतो, तसेच राजकारणाही स्वार्थासाठी वापर करून घेतात असे मत व्यक्त केले. प्राध्यापक एम. शेखर हे या पथकाचे नेतृत्व करत असून त्यात मे. डी. नोरबू, ए. सिदियो, आर. तिकहक, एन. सैना, कै. तेमक, डी. दुरी, डी. पुली, टी. कामशा, टि. सोमवेल यांचा समावेश आहे. जी. आय. शेख यांनी त्यांना नगरची माहिती दिली.