ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लेमिनचे (एआयएमआयएम) राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. असुद्दीन ओवेसी यांची शनिवारी सायंकाळी ७ वाजता अशोकनगरातील बुद्ध पार्कमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेला नागपूर शहर पोलिसांनी परवानगी दिली आहे.
याप्रसंगी एआयएमआयएमचे महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख अब्दुल हक नजीर, महाराष्ट्र विधानसभेतील गटनेते आमदार इम्तीयाज जलील आणि आमदार वारीस पठाण प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. ओवेसी वादग्रस्त व्यक्तव्य करीत असल्यामुळे समाजिक एकतेला धक्का पोहोचत असल्याचा आरोप होत आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांची पुणे येथील सभेला परवानगी नाकारली होती. परंतु नागपूर पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी दिली आहे. या जाहीर सभेत ते काही वादग्रस्त वक्तव्य करणार नाहीत, असा विश्वास एआयएमआयएमचे नागपूर शहराचे अध्यक्ष हाजी मोहम्मद सलीम आणि प्रवक्ते शकील पटेल यांनी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, ओवेसी यांच्या सभेला पोलिसांनी काही अटींवरच परवानगी दिली आहे. या अटीचे उल्लंघन केल्यास सभा आयोजित करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही आयोजकांना दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ओवेसी यांच्या सभेमुळे नागपुरातील सामाजिक वातावरण गढूळ होणार नाही, याची दक्षताही पोलीस घेत आहेत.