विविध विषयांवर संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेतर्फे ९ वेगवेगळ्या गटांत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
न्यायमूर्ती के. टी. तेलंग शिष्यवृत्ती ही ‘इंडोलॉजी’या विषयासाठी तर इंडल शिष्यवृत्ती सामाजिक विषयासाठी देण्यात येणार आहे. अनुक्रमे वार्षिक २ हजार रुपये व ९ हजार ८०० रुपये असे त्याचे स्वरूप असणार आहे. एशियाटिक सोसायटीच्या दोन शिष्यवृत्ती ‘सामाजिक विज्ञान’ या विषयासाठी देण्यात येणार असून ती रक्कम वार्षिक १२ हजार रुपये अशी आहे. कामगारविषयक अभ्यासासाठी एशियाटिक सोसायटीकडून वार्षिक १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अभ्यासाकरिता गुलिस्तान बिलिमोरिया ही वार्षिक १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती आहे. जी. एस. पोहेकर शिष्यवृत्ती ‘जपान’विषयक अभ्यासासाठी असून त्याची रक्कम वार्षिक ८ हजार रुपये इतकी आहे.
‘इतिहास’ या विषयासाठी डॉ. शीला राज स्मृती शिष्यवृत्ती देण्यात येणार असून त्याची रक्कम वार्षिक १६ हजार रुपये तर विमल शहा स्मृती संशोधन शिष्यवृत्ती ‘पाली-बुद्धिस्ट’ अभ्यासासाठी दिली जाणार असून त्याची रक्कम वार्षिक ४० हजार रुपये अशी आहे. विमल ए. शहा शिष्यवृत्ती ‘मीडिया स्टडीज’साठी दिली जाणार असून त्याची रक्कमही वार्षिक ४० हजार रुपये अशी आहे.
१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीसाठी या शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी अशी असून अधिक माहितीसाठी इच्छुकांनी संस्थेच्या कार्यालयात ०२२-२२६६००६२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या सचिव प्रा. विस्पी बालापोरिया यांनी केले आहे.