विधानसभा निवडणूकीच्या या रणधुमाळीत सोशल मिडियावर जोरात प्रचार, अपप्रचार सुरु असून नवी मुंबईत यासाठी वेगळे ग्रुप तयार केले गेले आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेनेचे व्हाटसअ‍ॅप वॉर यात आघाडीवर असून रात्री उशिरा पर्यंत या ग्रुप मधील कार्यकर्त्यांच्यात तू तू मै मै सुरु असल्याचे दिसून येते. यात राष्ट्रवादीने नवी मुंबईत केलेल्या कामांचा उहोपोह केला जात आहे तर शिवसेना न केलेल्या कामांचा ढोल वाजवित आहे. सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींना राज्य सरकारने लागू केलेल्या अडीच एफएसआयचा अध्यादेश अद्याप न आल्याने व्हॉटस अ‍ॅपवर जीआर वाक युध्द लढले आहे. या दोन प्रमुख पक्षाच्या तुलनेने काँग्रेस, मनसे भाजप उमेदवार मात्र यात पिछाडीवर आहेत.
लोकसभा निवडणूकीत सोशल मिडियाने केलेल्या अभूतपूर्व प्रचारामुळे भाजपचे मोदी सरकार केंद्रात आरुढ होऊ शकल्याने या प्रचाराला विधानसभा निवडणूकीत सर्वच प्रमुख पक्षांनी मनावर घेतले आहे. राज्यातील सर्व मतदार संघात हे सोशल मिडिया वॉर सुरु आहे पण नवी मुंबईत हा प्रचार टिपेला गेला असून त्यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचे स्वतंत्र गुप्र तयार केले गेले आहेत. यात माजी मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईत केलेल्या कामांची जंत्री वाचली जात असून ते सर्वसामान्यांसाठी कसे सहज उपलब्ध होत असतात ते सांगण्यात आले आहे. या विरोधात शिवसेनेचे पदाधिकारी नाईकांनी न केलेल्या कामांचा लेखा जोखा मांडता असून त्यांच्या घराणेशाहीवर आक्षेप घेतला जात आहे. हे वॉर आणखी टिपला पोहचणार असल्याचे दिसून येत असून नवी मुंबई पोलिसांनी यात अद्याप लक्ष घातलेले नाही असे दिसून येते.