मुंबईमधील अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई होत नाही. कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या सहाय्यक आयुक्तांना कुणाचीच भीती राहिलेली नाही. जोपर्यंत एखाद्या सहाय्यक आयुक्तावर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत अनधिकृत गोष्टींना आळा बसणार नाही, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालिका मुख्यालयात पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नवनियुक्त पालिका आयुक्त अजय मेहता यांची राज ठाकरे यांनी गुरुवारी पालिका मुख्यालयात भेट घेतली. या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी मुंबईतील विविध कामांबद्दल अजय मेहता यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, नवे पालिका आयुक्त अजय मेहता एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांच्याकडून मुंबईकरांच्या खूप अपेक्षा आहेत.
मुंबईमध्ये अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई होताना दिसत नाही. कारवाई करण्याची जबाबदारी सहाय्यक अधिकाऱ्यांवर आहे. परंतु ते कारवाई करीत नाहीत. या अधिकाऱ्यांना कोणाचीच भिती राहिलेली नाही. जोपर्यंत असे भ्रष्ट अधिकारी निलंबित होत नाहीत तोपर्यंत अनधिकृत बांधकामांना आळा बसणार नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान,  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याबद्दल राज ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकास अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, बाबासाहेबांच्या कार्याचा यथोचित गौरव झाला हे खरे असले तरी बाबासाहेब पुरंदरे हे महाराष्ट्र भूषण आहेत, हे सरकारला एवढय़ा उशिरा लक्षात यावे ही खेदाची बाब आहे. ज्यांनी छत्रपती शिवराय घराघरात पोहोचविले त्यांना वयाच्या ९३ व्या वर्षी हा सन्मान दिला जावा ही सरकारच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे, असे ते म्हणाले