राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत २००५ पासून वेगवेगळ्या स्तरावर अबंधित निधींची तरतूद झाली. गाव, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांच्या पातळीवर हा निधी उपलब्ध करून दिला गेला. तथापि, गावस्तरावरील अबंधित निधीच्या वापरात ना पारदर्शकता आहे, ना खर्चात नियमितता. नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात अभियानाच्या माध्यमातून मिळणारा अबंधित निधी संबंधितांना चरण्यासाठी मोकळे कुरण ठरल्याचे साथी संस्थेने नुकत्याच करण्यात आलेल्या सव्‍‌र्हेक्षणात निष्पन्न झाले आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता चतुसूत्रीवर काम करण्यासाठी अबंधित निधी वितरित करण्यात येतो. साथीने प्रातिनिधिक स्वरूपात पुणे, अमरावती, उस्मानाबाद, ठाणे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांत सव्‍‌र्हेक्षण केले. या उपक्रमांतर्गत उपलब्ध होणारा निधी गावातील पाणी, पोषण, स्वच्छता, आरोग्य यांवर जागृतीचे उपक्रम घडवणे, आपत्कालीन संदर्भसेवा, गावातील सार्वजनिक आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणे तसेच गरीब व गरजू व्यक्तींना संदर्भसेवा मदतीसाठी वापरावा असे निकष निश्चित करण्यात आले. यासाठी गावातील बँक खात्यात सरपंच व अंगणवाडी सेविका यांच्या नावे संयुक्त खाते तयार करत निधी जमा केला जातो.
या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होतो की नाही यासाठी स्वतंत्र समिती गठित करण्यात आली आहे. मात्र अबंधित निधीतून अभियानाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात असल्याचे सव्‍‌र्हेक्षणात दिसून आले. काही गावांना आर्थिक वर्षांच्या सुरुवातीऐवजी अगदी शेवटच्या महिन्यात निधी मंजूर झाला आहे. अशा परिस्थितीत ती गावे निधी खर्च करत नाही. उलटपक्षी ज्या ठिकाणी हा निधी सहज उपलब्ध होतो, त्या ठिकाणी समिती सदस्यांशी विचार विनिमय न करता आय.सी.डी.एस. निरीक्षकांच्या आदेशानुसार निधी खर्च करावा लागतो, असे अंगणवाडी सेविकांनी सांगितले.
निरीक्षकांकडून दिलेल्या तोंडी आदेशांना प्रमाण मानून अबंधित निधीमधून नेचरामोअर पावडर, वजन काटे, पाण्याचे फिल्टर्स अशा वस्तूंची  खरेदी करण्यात आली. तर काही ठिकाणी अंगणवाडी सेविका निधीची जबाबदारी आपल्यावर आहे म्हणजे तो खर्च पोषण आहारावर तसेच अंगणवाडीवर करायचा अशी गैरसमजूत करून घेतली. गावातील समित्या विचारविनिमया ऐवजी ‘वरून आदेश आला’ या सबबीवर कुपोषित बालकांसाठी बिस्किटे, प्रोटिन पावडर खरेदी करतात. स्थानिक तसेच रुग्णाची गरज काय याचा कुठेही विचार होत नाही. काही वेळा या निधीचा वापर नियोजन नसल्याने केस पेपर छापण्यासाठी, रुग्ण तपासणी अंतर्गत व बाह्य़ विभागाची स्टेशनरी खरेदी करण्यासाठी वा अन्य कुठेही केला जातो. तर काही ठिकाणी बँक खात्यात वर्षांखेरीस शिल्लक रक्कम दिसू नये म्हणून खर्च न झालेली रक्कम अंगणवाडी सेविका व सरपंच स्वतकडे काढून ठेवतात. त्याबाबत कुठलाही हिशोब, पावत्या किंवा माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आले. याबाबत काही उपाय सुचविण्यात आले आहे. त्यात लोकाधारित देखरेख प्रक्रिये अंतर्गत गावपातळीवर अबंधित निधी कसा खर्च करावा, या संदर्भात मार्गदर्शक पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ही पुस्तिका गाव समिती सदस्यांपर्यंत पोहोचविण्यात यावी, जेणेकरून त्यांना त्यांच्या हक्क तसेच कर्तव्याची जाणीव होईल, निधीच्या विनियोगाबद्दल
माहिती होईल, असे साथीने सुचविले आहे.