सातपूर येथील व्हीआयपी कंपनीतील कामगारांची सेवानिवृत्ती व कंपनीतील युनियनच्या निवडणुकीबाबत व्यवस्थापनाकडून दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप आ. नितीन भोसले यांनी केला आहे. कामगारांवरील अन्याय दूर करण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनास निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात यावेत अन्यथा बेकायदेशीररित्या निवृत्त होणाऱ्या कामगारांची सर्व जबाबदारी आपणावर व कंपनी व्यवस्थापनावर राहील, असा इशारा आ. नितीन भोसले यांनी कामगार उपायुक्तांना निवेदनाव्दारे दिला आहे.
व्हीआयपी कंपनीत पूर्वी पाच हजार कामगार कार्यरत होते. परंतु कंपनीने यांत्रिकीकरणाच्या नावाखाली कामगार कपात केली. कंपनीने अंतर्गत युनियनशी संगनमत करून ऑक्टोबर २००४ मध्ये कामगारांचे निवृत्ती वय ५६ वर्षे केले, असा आरोपही आ. भोसले यांनी केला आहे.  वास्तविक महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण धोरणानुसार निवृत्तीचे वय ५८ वर्षांचे आहे. या कराराची मुदत ३१ डिसेंबर २०१२ रोजी संपुष्टात आली. युनियनने २० नोव्हेंबर रोजी कंपनी व्यवस्थापनास १८ डिसेंबर २०१२ रोजी मुदत संपत असल्याची कल्पना दिली होती. त्याच्या आत घटनेनुसार निवडणूक घेण्याची विनंतीही केली होती. तरीही कंपनी व्यवस्थापनाने निवडणूक घेतली नाही. ८६ कामगार हे ५६ वर्षे वयाच्या कंपनीच्या सेवानिवृत्ती धोरणामुळे सेवानिवृत्त होणार आहेत. कंपनीच्या कराराची मुदत संपलेली असतानाही एका कामगाराला ५६ व्या वर्षी सेवानिवृत्त करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.